नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्या योजनांचा सर्वसामान्यांना सुलभतेने लाभ मिळावा, या उद्देशाने सर्व विभागांनी १०० दिवसांत करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याअंतर्गत आतापर्यंत केलेल्या कामांच्या मूल्यमापनात आदिवासी विकास आयुक्तालयाने राज्यातील सर्व आयुक्तालये व संचालनालये यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार होत असलेल्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. इतर अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. १५ विभागांच्या कामांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी सात कलमी कृती आराखडा निश्चित करण्यात आला होता. सर्व निकषांवर दमदार कामगिरी करणाऱ्या आदिवासी विकास आयुक्तालयाची १५ उत्कृष्ट विभाग आणि कार्यालयांमध्ये निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने विभागाचे सचिव विजय वाघमारे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाने १०० दिवसात करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी अपर आयुक्त तसेच प्रकल्प कार्यालयात ‘माहिती व सुविधा केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. सात कलमी कृती आराखड्याच्या माध्यमातून शासकीय कामात सुसूत्रता आणून लोकाभिमुख कामकाज केले जात आहे.

लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)

Story img Loader