अनिकेत साठे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : एकिकडे चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला भिडणाऱ्या सीमेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय लष्कराच्या ‘त्रिशूळ विभागाने’ने प्रत्येक मोहिमेत देदीप्यमान कामगिरी केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षांत याच विभागाच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांवर मात केली होती. या धुमश्चक्रीत २० अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. अतिशय संघर्षमय आणि गौरवशाली इतिहास लाभलेल्या विभागाच्या कामगिरीचा पट महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारातून साकारण्यात येणाऱ्या त्रिशूळ युद्ध संग्रहालयातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय लेह, लडाखच्या लष्करी पर्यटनास बळ देणार आहे.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये २२४ किलो बनावट पनीरसह मिठाई नष्ट, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

लेहच्या करू भागात या युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याची गाथा या संग्रहालयातून अनुभवण्यास मिळणार आहे. लेह-मनाली रस्त्यावरील करू हे ठिकाण १२ हजार फूट उंचीवर आहे. भारतीय सैन्यदलाच्या उपक्रमात एखाद्या राज्याने या प्रकारे सहभाग नोंदविण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ लेहच्या त्रिशूळ संग्रहालय उभारणीत महाराष्ट्राच्या योगदानाची संकल्पना मांडली होती. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी तत्काळ तीन कोटींचा निधी उपलब्ध केला. या कामात समन्वयाची जबाबदारी आमदार भारतीय यांच्यावर सोपविली. त्यांच्या पथकातील अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले यांचे या उपक्रमात सहकार्य मिळत आहे.

हेही वाचा >>> मंडळनिहाय एकच ढोल पथक ठेवण्याची सूचना; मिरवणुकीत आवाजाच्या भिंतींसाठी गणेश मंडळे आग्रही

त्रिशूळ विभागाचे प्रमुख मेजर जनरल पी. के. मिश्रा यांनी नवीन त्रिशूळ संग्रहालयाचा प्रस्ताव ठेवला होता. ६०३ ईएमई तुकडीने त्याचा आराखडा तयार केला. लेह, लडाख भागात दरवर्षी देश आणि परदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. उत्तुंग सीमेवर अतिशय प्रतिकूल स्थितीत सैन्यदल काम करते. संग्रहालयास भेट देणारे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील. तसेच त्यांनी गाजविलेल्या शौर्याची मोहीमनिहाय माहिती या ठिकाणी मिळू शकेल. 

चिनी आक्षेप खोडणे शक्य

लेह-लडाखमध्ये भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. या निमित्ताने लष्करी पर्यटनास अधिक चालना मिळू शकेल. चीनकडून सीमावर्ती भागांशी संबंधित वादग्रस्त नकाशे प्रकाशित केले जातात. संग्रहालयातून परदेशी पर्यटकांसमोर भारतीय सीमेवरील वास्तव चित्र समोर येईल. भारतीय संघराज्य प्रणालीत विकसित राज्याने सीमावर्ती दुर्गम राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठीचे हे उदाहरण इतरांनाही मार्गदर्शक ठरणार आहे.

वैशिष्टय़े..

* लष्कराच्या उत्तर कमांडच्या अंतर्गत त्रिशूळ पायदळ विभाग कार्यरत

* या विभागाने १९६२ भारत-चीन आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धासह मेघदूत, त्रिशूळ शक्ती, विजय, बॉटलनेक, स्टेडफास्ट, डोझर आणि २०२० मधील पँगॉँग सरोवर क्षेत्रातील स्नो लेपर्ड मोहिमांमध्ये शौर्याचे दर्शन घडविले

* या मोहिमांमधील शहीद अधिकारी-जवानांची माहिती संग्रहालयात असणार आहे. गलवान खोऱ्यातील शहीद जवानांचे पाषाण शिल्प, विभागाच्या स्थापनेपासून वाटचाल, विविध मोहिमेत मिळालेली शौर्य पदके यांची माहिती देण्यात येणार आहे.

* आजवर युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे, दारूगोळा, लष्करी वाहने या ठिकाणी प्रत्यक्ष बघता येतील. लष्कराच्या आधुनिकीकरणाचे टप्पे लक्षात येतील. युद्धात शत्रूच्या हस्तगत केलेल्या वस्तू संग्रहालयात दिसतील. * यामध्ये शस्त्रांसह दारूगोळा, ओळखपत्र, संपर्क साधने, कुटुंबीयांशी झालेला पत्रव्यवहार आदींचा अंतर्भाव आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt initiative for trishul war memorial museum in leh ladakh zws
Show comments