महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल गुरूवारी आभासी प्रणालीन्वये जाहीर झाला. नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २.६९ टक्क्यांनी घट झाली आहे. विभागात जळगाव जिल्हा ९३.२६ टक्क्यांसह प्रथम तर, नाशिक (९०.१३ टक्के) तळाला राहिला. नेहमीप्रमाणे मुलींनी यंदाही मुलांना मागे टाकले आहे. पाच जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरूवारी दुपारी दोन वाजता परीक्षेचा निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाला. परीक्षार्थीना निकाल पाहण्याची उत्सकुता असल्याने अनेक जण तत्पुर्वी क्रमांक टाकून छाननी करीत होते. मंडळाने दोनची वेळ दिलेली असली तरी अनेकांना १० ते १५ मिनिटे आधीच निकाल पाहण्यास मिळाला. एकाच वेळी अनेकांकडून संकेतस्थळावर लॉगीन होत असल्याने अनेकदा सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवते. तशा तक्रारी यंदा फारशा आल्या नाहीत. निकाल कळल्यानंतर घराघरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निकालात राज्यात नाशिक सातव्या क्रमांकावर राहिले.

हेही वाचा >>> जळगाव: विलास मोरेंची पांढरे हत्ती काळे दात उत्कृष्ट कादंबरी

नाशिक विभागात विज्ञान शाखेत ७७, ९२५ पैकी ७५,४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ९६.८४ टक्के लागला. वाणिज्य शाखेत २०,७५३ पैकी १९,५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेची टक्केवारी ९४ अशी राहिली. कला शाखेत ५५,८२९ पैकी ४६,९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ८४.०१ टक्के लागला. व्यावसायिक अभ्यासक्रमात ४४११ पैकी ३७९२ विद्यार्थी उत्तीर्ण असून ८५.९६ टक्के निकाल लागला. विभागात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.४६ टक्के तर मुलींचे ९४.४६ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे पावणेतीन टक्क्यांनी घट झाली. यामागे अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षेतील फरक हे कारण असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा झाली होती. यंदा मात्र १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा झाली.

विभागातील टक्केवारी

नाशिक विभागात एक लाख, ५९ हजार ०२९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील एक लाख ४५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये जिल्हावार टक्केवारी नाशिक ९०.१३, धुळे ९२.२९, जळगाव ९३.२६, नंदुरबार ९३.०३ अशी आहे. परीक्षा काळात ६६ गैरमार्ग प्रकरणी ६६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी मुदत

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी २६ मे ते पाच जून या कालावधीत आणि छायाप्रत मिळविण्यासाठी २६ मे ते १४ जून या कालावधीत आभासी पध्दतीने शुल्क भरून अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असल्यास त्यांनी मंडळाशी संपर्क करावा. पाच जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयात गुणपत्रक वितरित होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra hsc results 2023 nashik division result 91 66 percent zws