प्रवेशद्वाराबाहेर मुंढे समर्थकांचे आंदोलन, नगरसेवक अन् प्रशासकीय वर्तुळात रंगलेली चर्चा, स्थायी समितीच्या सभेची लगबग, सभेला मुख्यालयात असूनही अनुपस्थित राहिलेले आयुक्त तुकाराम मुंढे, असे दुपारी १२ पर्यंत दिसणारे चित्र बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर अकस्मात बदलले. मुंढे यांनी क्षणाचाही विलंब न करता खिन्न मनस्थितीत पालिका मुख्यालय सोडले.
लगोलग महापौरांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आयुक्तांविरोधात खदखद व्यक्त करत कामकाज लवकर आटोपले. मुंढे यांची बदली झाल्याचा आनंद नगरसेवकांसह इतरही अनेक घटकांना झाला.
आयुक्त मुंढे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी पालिकेत धडकल्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. मुंढे यांच्या बदलीवर सरकारने शिक्कामोर्तब केल्याचे आदल्यादिवशी स्पष्ट झाले होते. परंतु, लेखी आदेश प्राप्त झालेले नव्हते. सकाळी नेहमीप्रमाणे मुंढे हे आपल्या कार्यालयात दाखल झाले. तत्पूर्वी, समर्थकांनी प्रवेशद्वारावर मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करत अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली.
दरम्यानच्या काळात स्थायी समितीच्या सभेत मुंढे हे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. प्रभारी आयुक्त म्हणून किशोर बोर्डे सभेला उपस्थित राहिले. या काळात मुंढे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकारकडून अद्याप आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. आयुक्तांची बदली रद्द करावी म्हणून आंदोलन करणाऱ्या शिष्टमंडळाला मुंढे यांनी तेच सांगितले. यामुळे आयुक्तांची भेट घेतल्यानंतर समर्थकांना हायसे वाटले आणि त्यांनी परतीचा मार्ग पत्करला.
स्थायी समितीची सभा सभापती हिमगौरी आहेर-आडके आणि प्रभारी आयुक्त बोर्डे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. मुंढे उपस्थित नसूनही सदस्यांची त्यांच्याविषयीच्या खदखद व्यक्त केली. मागील सभेत म्हणजे मुंढे यांच्या कार्यकाळात ‘टीडीआर’ आणि घंटागाडीतील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला गेला होता. परंतु, त्या सभेच्या इतिवृत्तात त्याचा समावेश नसल्याने सदस्यांनी कार्यवृत्त मंजूर करण्यास आक्षेप घेतला.
घंटागाडी ठेक्याची चौकशी करावयाची असताना देयक दिल्याच्या कारणावरून सदस्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांवर शरसंधान साधले. अधिकारी चुकीच्या काम करणाऱ्यांना पाठीशी घालतात, असे आक्षेप नोंदविले गेले. महापालिकेच्या मिळकती भाडेपट्टय़ाने नोंदणीकृत संस्था, मंडळांना भाडेपट्टय़ाने देण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यास विरोध केला गेला.
सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे अधिकार अबाधित राखण्यासाठी आयुक्तांना अधिकार देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. यावर बरीच चर्चा झाल्यावर अखेर सभापतींनी हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवून भाडे आकारणीविषयी नवीन प्रस्ताव सादर करण्यास सूचित केले.
सत्ताधारी-विरोधी सदस्यांचा आनंदोत्सव
ही सभा सुरू असताना बदलीचे आदेश प्राप्त झाले. मुंढे यांना आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यास सांगण्यात आले. आदेश प्राप्त झाल्यानंतर मुंढे हे खिन्न मन:स्थितीत पालिका मुख्यालयातून बाहेर पडले. आयुक्तपदाचा कार्यभार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला. मुंढे हे पालिकेतून निघून गेल्यानंतर सत्ताधारी-विरोधी सदस्यांकडून आनंदोत्सव सुरू झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडले.