जळगाव : भाजप सत्तेसाठी हपापलेली दिसतेय. राज्यात फोडाफोडीचेच राजकारण चालले आहे. राज्यातील राजकारणाची सद्यःस्थिती घाणेरडी आणि किळसवाणा प्रकार आहे. महाराष्ट्रानं असं राजकारण पाहिलंच नव्हतं. सद्यःस्थितीतील या घाणेरड्या राजकारणाची महाराष्ट्राला किळस आली आहे. आमदार या पक्षातून त्या पक्षात जाण्याच्या अफवा भाजपच पसरवीत असल्याचा गंभीर आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला.
जळगावातील निवासस्थानी आमदार खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शिवसेना शिंदे गट व भाजपमधील आमदारांची अस्वस्थता, मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्री होण्यासाठी उभे आहेत. अनेक आमदार स्वतःहून सांगताहेत, मी मंत्री होणार आहे, असा मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मी मंत्री होणार आहे, मी पालकमंत्री होणार आहे; तर काही जण म्हणताहेत, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आहे, माझा शपथविधी ठरविला आहे. अशा स्थितीत प्रत्येक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहे, मंत्रिमंडळात जाण्यास इच्छुक आहे. मात्र, ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होईल, त्यावेळी या दोन्ही गोष्टींतून नाराजीची मोठी उकळी होणारच आहे, असा दावाही खडसे यांनी केला.
हेही वाचा >>> नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
भाजपमधील आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही नाराजी, अस्वस्थता ते बाहेर बोलत नाहीत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचे अनेक आमदार नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यासंदर्भात ते माझ्याशीही चर्चा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोबत घेतलेल्या निर्णयाचा संबंध नागपूरशी असल्याचे सांगतात, असेही त्यांच्याकडून चर्चेत ते सांगतात, असा दावा खडसे यांनी करीत एकंदरीत याचा परिणाम निश्चित आगामी काळात दिसेल. तो शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनुकूल असेल असेही नाही, असे सूचक विधानही खडसेंनी केले. काँग्रेसचे आमदार आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या व त्यांचा मंत्रिमंडळात समावेशासाठी विस्तार लांबल्याच्या होत असलेल्या चर्चेवर खडसे यांनी भाष्य केले.
हेही वाचा >>> Maharashtra News Live : मुंबई-ठाण्यात जोरदार पाऊस, पश्चिम उपनगरात जोर वाढला
मला असे नाही वाटत की, काँग्रेसचे कुणी जाईल. काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात कर्नाटकच्या निवडणुका जिंकल्यानंतर एकप्रकारचा उत्साह आहे आणि त्यांना असं वाटतंय की, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची जी पोकळी आहे, ती आपला काँग्रेस पक्षच भरू शकेल. काही महिन्यांसाठी, काही दिवसांसाठी काँग्रेसमधून भाजपकडे जाईल, असे मला वाटत नाही. भाजपकडून काहीही अफवा पसरविल्या जात आहेत. काही वेळा डाव टाकण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. सध्या भाजप सत्तेसाठी हपापलेली दिसतेय, अशी टीकाही खडसे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.