|| अविनाश पाटील

११ व्या वर्षांपासून कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात, कुस्तीसह बंधुता आणि माणुसकीचीही शिकवण 

नाशिक :  आपल्या व्यायामशाळेतून, तालीम संघातून एकतरी ‘महाराष्ट्र केसरी’ व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईलच असे नाही. भगूरचे कुस्ती प्रशिक्षक गोरखनाथ बलकवडे यांची ४० वर्षांपासूनची इच्छा यंदा हर्षवर्धन सदगीरच्या रूपाने पूर्ण झाली. त्यामुळे नाशिकला पहिला ‘महाराष्ट्र केसरी’ मिळवून देणारी ‘स्वातंत्र्यसैनिक नरसिंगराव बलकवडे व्यायामशाळा’ चांगलीच चर्चेत आली आहे. ही व्यायामशाळा आहे तरी कशी, याची सर्वानाच उत्सुकता आहे.

कुस्तीपेक्षा बंधुता आणि माणुसकी मोठी हा धडा देणारी ही व्यायामशाळा म्हणजे जणूकाही अलिबाबाची गुहाच आहे. याच व्यायामशाळेत वयाच्या ११ व्या वर्षी दाखल झालेल्या हर्षवर्धनने कुस्तीचे डाव आत्मसात केले. व्यायामशाळेची इमारत बाहेरून पारंपरिक पध्दतीची वाटत असली तरी आतमध्ये गेल्यावर वेगळेच दृश्य दिसते. कुस्तीसाठी आवश्यक परिपूर्णता या व्यायामशाळेत काठोकाठ भरलेली जाणवते. इतर व्यायामशाळांमध्ये क्वचितच दिसणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट, मातीचा हौद, ज्युदो-कराटे कक्ष, अत्याधुनिक यंत्रणा, कुस्तीगीरांची जेवण आणि निवास व्यवस्था, एकावेळी २०० पेक्षा अधिक मुले बसू शकतील असा भोजनकक्ष, असे सर्वकाही या व्यायामशाळेत आहे. बंदिस्त स्टेडियमची छोटी प्रतिकृती ठरावी असे सुमारे दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे मैदानही येथे आहे.

आजपर्यंत दोन हजारपेक्षा अधिक पोलीस आणि जवान या व्यायामशाळेने तयार केले आहेत. पोलिसांच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसह राज्यस्तरीय ग्रीको रोमन, शालेय,महिला, कुमार अशा विविध गटांच्या स्पर्धा या व्यायामशाळेत झाल्या आहेत. व्यायामशाळेतील सर्व सुविधांमुळेच भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) येथे कुस्तीचे केंद्र सुरू केले. उत्तर महाराष्ट्रातील साईचे हे एकमेव कुस्तीचे केंद्र आहे. या केंद्रात राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले ९० मुले आणि २० मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत.

कुस्तीच्या राष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आजपर्यंत या व्यायामशाळेला भेट दिली आहे. २००१ पासून जिल्हा ग्रामीण तालीम संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे गोरखनाथ बलकवडे यांनी आपल्या व्यायामशाळेतून कोणीतरी महाराष्ट्र केसरी व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. १९७९ मध्ये नाशिकरोड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात गोरखनाथ यांनी विजेतेपद मिळविले होते. महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात वयोगटासाठी नाशिकला मिळणारे हे पहिलेच सुवर्णपदक होते. खुल्या गटात विजेतेपद मिळविण्याची त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा यंदा हर्षवर्धन सदगीर या त्यांच्या शिष्याने पूर्ण केली