Maharashtra Lok Sabha Election Result 2024 updates जळगाव : लोकसभेच्या जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडी यांच्यात खरी चुरशीची लढत होत असून, यात कोणाचा वरचष्मा राहणार, हे दुपारी चारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मात्र, उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धाकधूक वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात १४ व रावेर मतदारसंघात २९ उमेदवार आखाड्यात आहेत. दोन्ही मतदारसंघांत अनेक मनोरंजक राजकीय घडामोडी घडत वार-पलटवारांत जिल्हा राज्यात चर्चेचा विषय ठरला. भाजपने जळगावातून खासदार असलेले उन्मेष पाटील यांची उमेदवारी डावलत २०१९ मधील निवडणुकीत उमेदवारी अचानक रद्द केलेल्या माजी आमदार स्मिता वाघ यांना यंदा संधी दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या. रावेरमधून भाजपने खासदार रक्षा खडसेंना तिसर्‍यांदा संधी दिली.

हेही वाचा…Maharashtra Lok Sabha Election Result 2024 जळगाव, रावेरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर

भाजपने महिनाभरापूर्वीच उमेदवारांची यादी जाहीर करीत बाजी मारली असताना पहिल्यांदा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चांना ऊत आला होता. राजकीय घडामोडी घत असताना उन्मेष पाटील यांनी त्यांचा मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पाटील- पवार यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करीत, उन्मेष पाटील यांच्या आग्रही भूमिकेमुळे करण पाटील- पवार यांना उमेदवारी जाहीर झाली. रावेरमधून महाविकास आघाडीतर्फे अवघ्या काही महिन्यांपूर्वी तीन पक्ष बदल करून राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले नवीन चेहरा रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारीची संधी देण्यात आली. रावेरमधून वंचित बहुजन आघाडीने अभियंता संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी देत आव्हान उभे केले. या मतदारसंघात तिरंगी लढत रंगली आहे.

हेही वाचा…Maharashtra Lok Sabha Election Result 2024 जळगावात मतमोजणीस प्रारंभ; सत्ताधारी-विरोधकांच्या समर्थकांत धाकधूक

निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने आघाडी घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले होते. प्रचारावेळी महायुती व महाविकास आघाडी यांच्या चुरशीची लढत होत आहे. एकनाथ खडसेंच्या भूमिकेमुळे विशेषतः रावेरकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रचारात वार-पलटवारांचे वाक्युद्ध रंगले होते. दोन्ही बाजूंनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांनी धुरळा उडाला होता. दोन्ही मतदारसंघांत सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात चुरशीची बनली. यातच जळगावसाठी ५७.७ टक्के, रावेरमधून ६४.२७ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली. त्यानंतर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले होते. मंगळवारी (४ जून) सकाळी आठपासून मतमोजणी सुरू झाली असून, दुपारी चारपर्यंत उमेदवारांचे भवितव्य उघडणार आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे. जसजसे निकाल हाती येतील, तसतसा जल्लोषही होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lok sabha election result 2024 live intense battle unfolds between mahayuti and maha vikas aghadi in jalgaon and raver lok sabha constituencies psg