नाशिक : विविध प्रलोभनांनी गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ९० टक्क्यांहून अधिक टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिक शहरातील केंद्राबाहेर एका उमेदवाराच्या समर्थकांना पैसे वाटप करताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. असे प्रकार सर्वत्र घडले असून निवडणूक आयोगाने दुजाभाव न करता याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली.

हेही वाचा >>> Maharashtra MLC Polls : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे ७० टक्के मतदान

पाच जिल्ह्यांच्या या मतदारसंघातील ९० केंद्रांवर बुधवारी मतदान झाले. रिंगणात २१ उमेदवार असून शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे अॅड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. बहुतांश केंद्रांवर सकाळपासून मतदारांचा अभूतपूर्व उत्साह दिसत होता. आपले हक्काचे मतदान करून घेण्यासाठी अखेरपर्यंत राजकीय पक्ष व उमेदवारांची धडपड सुरू होती. मतदारसंघात एकूण ६९ हजार ३६८ इतके मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९१.६३ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ९६ टक्के मतदान झाले. जळगाव, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतमोजणी एक जुलै रोजी अंबडस्थित वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे.

केंद्राबाहेर पैसे वाटपाचे प्रकार प्रलोभनांवरून आरोप-प्रत्यारोप

नाशिकमधील बी. डी. भालेकर शाळेच्या केंद्राबाहेर एका उमेदवाराच्या समर्थकांकडून मतदारांना पैशांची पाकिटे दिली जात असल्याचा आरोप करून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीला पकडून भद्रकाली पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयिताकडून विविध पाकिटात ठेवलेली ६९ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. महिलाही पैसे वाटपात सहभागी असून मागील निवडणुकीत भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी पुन्हा पैसे वाटप करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते वसंत गिते यांनी केला. हे आरोप शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी फेटाळले. मतदानाच्या दिवशी आपण दिवसभर येवल्यात होतो. पैसे वाटपाशी आपला कुठलाही संबंध नाही. असे प्रकार आपण कधीही केले नसल्याचा दावा त्यांनी केला.