नाशिक – प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी अखेरच्या घटकांवर, म्हणजे लहान विक्रेत्यांवर अनेकवेळा दंडात्मक कारवाई करुनही प्रत्यक्षात परिणाम दिसत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता उत्पादक, वितरकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी याबाबत माहिती दिली. महानगरपालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला. मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आगामी कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे काम करणार असल्याचे कदम यांनी नमूद केले. गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी महानगरपालिकेने उपनद्या व नाल्यांमधील सांडपाणी वाहून नेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कृती आराखडा तयार केलेला आहे. या कामात महापालिकेला सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जल प्रदूषणाची चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गोदावरी नदीचे पाणी दूषित नसल्याचा उल्लेख झाला होता. पुढील काळात नदी प्रदूषणाविषयी चुकीची माहिती दिली गेल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा कदम यांनी दिला.

मनपा आयुक्तांना प्रशस्तीपत्रक आणि प्रशासनाच्या कामाचे कौतुक

महानगरपालिकेत सुमारे तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासकीय राजवट आहे. काही महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त तथा प्रशासकपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या मनिषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कामांमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम प्रभावित झाले आहेत. महानगरपालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसले तरी खत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चांगले काम करीत असल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी दिले.

गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या कदम यांनी महानगरपालिकेत भेट देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीत दैनंदिन घनकचरा संकलन, त्यावर होणारी प्रक्रिया, या प्रक्रियेवर तत्क्षणी देखरेखीची व्यवस्था दाखवली गेली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी निर्मिलेला आराखडा सादर करण्यात आला. महापालिकेच्या एकंदर कारभाराने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कदम हे चकीत झाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब कथन करीत प्रशासकीय राजवटीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचे दिसले.

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करीत आहे. कचरा संकलन, प्रक्रिया यावर व्यवस्थित काम होत आहे. गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या तुलनेत नाशिक महापालिकेकडून अनेक आगळेवेगळे उपक्रम राबविले जातात. इतर महानगरपालिकांनी नाशिकचे अनुकरण करायला हवे. अतिशय सोप्या असणाऱ्या या गोष्टी खर्चिकही नाहीत. अन्यत्र केवळ नियोजन होते. प्रस्ताव केले जातात. कामाची फलश्रृती दिसत नाही, तोपर्यंत कुठल्याही कामाला अर्थ नसतो, असे त्यांनी सूचित केले. पुढील काळात नाशिक महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे चांगल्या दृष्टीकोनातून काम करणार, असे कदम यांनी नमूद केले.