नाशिक : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भांडार खुले व्हावे, त्यांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत राहावे तसेच डिजीटल युगाचा ४.० चा टप्पा गाठण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेण्यास सुरूवात केली आहे. सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राज्यातील पहिले इ ग्रंथालय आकारास आले असून लवकरच ते विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.
सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सद्यस्थितीत २३०० विद्यार्थी फिटर, इलेक्ट्रिशियन, मोटर मॅकेनिक, प्लास्टिक, एरोनोटिकल , इंटरनेट ऑफ स्मार्ट सिटी यासह वेगवेगळ्या विषयांवरील ३० अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. प्रात्यक्षिकांसह अभ्यास करण्यासाठी १०३ गट कार्यरत आहेत. प्रशिक्षण संस्थेत प्रात्यक्षिकांवर भर दिला जात असताना अन्य अभ्यास साहित्य मिळविताना मर्यादा येतात. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रशिक्षण संस्थेत डिजीटल ग्रंथालय सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य मोहन तेलंगी यांनी दिली. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव
संस्थेच्या आवारातच ५० संगणक संच असलेले अत्याधुनिक असे ग्रंथालय सुरू होत आहे. या ठिकाणी आयटीआयच्या ३० अभ्यासक्रमांची सखोल माहिती, कुठल्या अभ्यासक्रमात कोणता अभ्यास करावा लागेल, काय अपेक्षित आहे, याची क्यु आर कोडच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. संस्थेचे प्रा. जयराम ससाणे व अन्य सहकाऱ्यांनी ही संकल्पना आकारास आणली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एका कळसरशी अभ्यासक्रमाची माहिती, आकृती, लिखाण, गणित आदी माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कसे असते याचे दृकश्राव्य स्वरुप पाहता येईल. आपला अभ्यास झाला की नाही हे आजमावण्यासाठी एमसीक्यु परीक्षाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी देता येणार आहे. लवकरच हे इ ग्रंथालय विद्यार्थ्यांना खुले होईल. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी संदर्भ पुस्तके, समूह चर्चेसाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे.
हेही वाचा : कसारा घाटात थांबणाऱ्या वाहनांना आवर, अपघात रोखण्यासाठी ना वाहन तळ क्षेत्रात लोखंडी जाळ्या
नाशिक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इ ग्रंथालयात एका कळसरशी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे.
प्राध्यापकांचे कष्ट
आयटीआयसाठी राज्यातील पहिले इ ग्रंथालय सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू होत आहे. संबंधित विभागाच्या आयुक्तांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन होईल. याठिकाणी क्यु आर कोडच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येत आहे. हे सर्व काम येथील प्राध्यापकांनी केले आहे. सध्या ३० संगणकांचा संच या ठिकाणी आहे. औद्योगिक प्रशिक्षणाच्या केंद्रस्तरावरून घेण्यात येणाऱ्या सीबीटी परीक्षाही या ठिकाणाहून लवकरच घेण्यात येतील, असा विश्वास आहे.
प्राचार्य मोहन तेलंगी ( शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक)