महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने यंदाही प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून वाचणारा पैसा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जमा करावा असे आवाहन अंनिसने केले आहे. तसेच फटाकेमुक्त अभियान राबविताना कारखान्यातील बालकामगारांचे आरोग्य आणि उपजीविकेच्या प्रश्नावर शासनाने ठोस उपक्रम हाती घ्यावा, यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
याबाबतची माहिती अंनिसचे जिल्हा समन्वयक महेंद्र दातरंगे यांनी दिली. अंनिसकडून दीपावली फटाकेमुक्त पद्धतीने साजरी व्हावी यासाठी १७ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. फटाक्यांच्या आतषबाजीने नभांगण तेजोमय होत असले तरी त्याचा मानवी प्रकृतीवर विघातक परिणाम होत असून जल, वायू आणि ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. याकडे लक्ष वेधून अंनिसने फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन केले आहे. यासाठी पत्रके तयार करत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. फटाक्यांसाठी होणारा सरासरी खर्च पाहता विद्यार्थ्यांनी ही रक्कम वाचवून त्यातून पुस्तके, खेळणी, किल्ला बनविण्यासाठीची सामग्री खरेदी करावी, असे आवाहन करण्यात येते. मागील वर्षी फटाक्यांवर खर्च होणारी २४ कोटींची रक्कम या माध्यमातून वाचविण्यात आली होती. यंदा राज्यावरील दुष्काळाचे सावट, त्यात भरडला गेलेला बळीराजा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांचा विचार करता विद्यार्थ्यांनी या अभियानास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा