महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पुढाकार
केंद्र सरकारने गतवर्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा नारा दिला आणि सर्वानी हातात झाडू घेत सक्रिय सहभाग नोंदविला. या अभियानात सरकारी कार्यालयांनी दाखविलेली उत्स्फूर्तता आरंभशूरता ठरल्याचा अनुभव आला. या एकंदर स्थितीत पर्यटन विकास महामंडळाने या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबर पर्यटकांमध्ये राज्याची प्रतिमा उजळावी यासाठी पुन्हा एकदा त्या अंतर्गत ‘चला पर्यटनस्थळे स्वच्छ करू या..’ची हाक दिली असून यासाठी खास पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील तसेच परदेशातील पर्यटकांसमोर राज्याची प्रतिमा उजळ राहावी, यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याचा एक भाग म्हणून नाशिकच्या प्रादेशिक कार्यालयाकडून ७ ते १५ डिसेंबर या कालावधीत नाशिक विभागात स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून पर्यटनस्थळांवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पर्यटनस्थळ स्वच्छ व सुंदर करणे, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करणे या मागील उद्देश. परिसराच्या स्वच्छतेबाबत स्थानिक जनता, विक्रेते व फेरीवाले यांचे विशेष प्रबोधनही मंडळाचे पथक करणार आहे. यासाठी परिसरात सूचनाफलक लावणे, परिसरातून फेरी काढणे आदी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या सप्ताहात काळाराम मंदिर, पांडवलेणी, दादासाहेब फाळके स्मारक, कपिलधारा तीर्थ, अहमदनगर येथील भुईकोट किल्ला, सिद्धटेक, भंडारदरा व शिर्डी यांची निवड करण्यात आली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले अपुरे मनुष्यबळ लक्षात घेत पुरातत्व विभाग, दादासाहेब फाळके स्मारक, काळाराम मंदिर विश्वस्त, महानगरपालिका, नागरी संरक्षण दल, सिद्धटेक देवस्थान तसेच स्थानिक ग्रामपंचायत, साधुमहंत, पुजारी, शैक्षणिक संस्था आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
पर्यटन विकास महामंडळाच्या मोहिमेच्या हेतूबद्दल शंका नसली तरी पंधरवडय़ानंतर उपरोक्त स्थळांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिंहस्थात गोदावरी स्वच्छतेसाठी शासकीय विभागांनी अशीच मोहीम राबविली होती. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना स्वच्छ गोदावरी दृष्टिपथास पडावी म्हणून सर्व विभाग झाडून सहभागी झाले.
कुंभमेळ्यातील तीन प्रमुख शाही स्नान झाल्यावर गोदावरीच्या स्वच्छतेकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले. पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेसाठी काही दिवस हा उपक्रम राबविला जाणार असला तरी पुढील काळात त्या ठिकाणांची अवस्था गोदावरीसारखी होणार नाही, याची दक्षता घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. देशात स्वच्छता अभियान सुरू होऊन वर्षभराहून अधिकचा कालावधी लोटला आहे. त्यावेळी फारशा सक्रिय नसलेल्या महामंडळाने पर्यटनस्थळांची स्वच्छता व सुरक्षितता या उपक्रमानंतरच्या नियोजनाची स्पष्टता केलेली नाही.
मोहिमेत स्थानिक संस्थांना सहभागी करून घेण्यात आले असले तरी या प्रक्रियेत त्यांनी तटस्थ राहत केवळ मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली आहे. मोहिमेत सातत्य राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पर्यटनस्थळीही आता स्वच्छतेचा आग्रह
‘स्वच्छ भारत’ अभियानाचा नारा दिला आणि सर्वानी हातात झाडू घेत सक्रिय सहभाग नोंदविला.
Written by मंदार गुरव
आणखी वाचा
First published on: 05-12-2015 at 01:47 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra tourism development corporation initiative for clean india campaign