महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीसाठी बराच मोठा निधी खर्च करत असले तरी जेव्हा अतिशय सहज व कमी खर्चात हे काम करणे शक्य आहे, तेव्हा मात्र या विभागाची कार्यशैली काहीशी वेगळी राहत असल्याचा अनुभव मांगीतुंगी येथे येत आहे. जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यात या कार्यशैलीची अनुभूती देशभरातील भाविक घेत आहेत. मांगीतुंगी येथे महामंडळाने उभारलेल्या स्टॉलमार्फत नाशिकसह राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती किंवा आलेल्या भाविकांना कमी किमतीत आणि वेळेत कसे पर्यटनाचे पर्याय अनुभवता येतील याची प्रसिद्धी करताना हिंदी भाषिक भाविक येणार याचाच नेमका विसर पडल्याचे दिसते. काही इंग्रजी प्रसिद्धिपत्रकांचा अपवाद वगळता मराठी प्रसिद्धिपत्रके देऊन वेळ निभावून नेली जात आहे. यामुळे ही माहिती घेणारा भाविकही गोंधळलेला दिसतो.
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी पर्वताच्या पायथ्याशी जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ऋषभदेव महाराज यांचा महामस्तकाभिषेक सोहळा सुरू आहे. या सोहळ्यास देशभरातून हजारो भाविक दाखल होत आहेत व येणार आहेत.
महोत्सवाच्या निमित्ताने मांगीतुंगीसह नाशिक व राज्यातील पर्यटनस्थळांचे विपणन करण्याची संधी पर्यटन विकास महामंडळास उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने महामंडळाने मुख्य सभामंडपासमोर आपला स्टॉलही उभारला. स्टॉलला भेट देणाऱ्या भाविकांना राज्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, तेथे कसे जाता येईल, त्या ठिकाणी मंडळाची असणारी निवास व्यवस्था, त्या पर्यटन स्थळाचे वैशिष्टय़े याविषयी माहिती देणारी विविध रंगीत सचित्र पत्रके ठेवण्यात आली आहेत. कुंभमेळ्यानिमित्त खास तयार आलेले ‘पॅकेज’ ज्यात नाशिक येथील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच नव्याने प्रसिद्धीस आलेल्या पर्यटनस्थळांची सचित्र माहिती तसेच नाशिकजवळील शिर्डी, औरंगाबाद, अहमदनगर येथील पर्यटनस्थळांची माहिती देणारी मराठी पत्रके ठेवण्यात आली आहेत. भाविकांनी स्टॉलवर यावे, ते पत्रक वाचावे, जुजबी चौकशी केल्यास पत्रकातील तपशील नीट पाहावा आणि मार्गस्थ होण्यापूर्वी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा, या पद्धतीने महामंडळाचे काम सुरू आहे.
वास्तविक भेट देणारे बहुतांश जैन बांधव हिंदी भाषिक असल्याने मराठी पत्रकातील तपशील त्यांना कितपत समजेल याविषयी साशंकता आहे. महामंडळाने त्याचा काही विचार केला नसावा असे स्टॉलवरील पत्रकांवरून दिसते. एक-दोन इंग्रजी भाषेतील पत्रके वगळता सर्व काही मराठीच आहे. या प्रसिद्धिपत्रकाची तऱ्हा वेगळीच म्हणता येईल. पत्रकांवरील ‘फॉण्ट’च्या आकाराने सर्वसामान्यांना वाचन करताना अडचणी येतात. पर्यटन स्थळ म्हणून नाशिकचा होणारा विकास याकडे लक्ष वेधण्यासाठी भाविकांना सिंहस्थ कालावधीत तयार केलेल्या छोटेखानी पॅकेजची मौखिक माहिती व्हावी यासाठी कोणतीही सोय करण्यात आली नाही.
सिंहस्थानिमित्त तयार केलेल्या ४० हून अधिक नव्या दमाचे ‘गाईड’ अर्थात मार्गदर्शक प्रसिद्धीकामी महत्त्वाची भूमिका निभावू शकले असते, पण त्यांचाही महामंडळाला विसर पडल्याचे दिसते. मंडळाने पर्यटनवृद्धीसाठी कागदी पत्रव्यवहारापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला तर चित्र नक्कीच बदलू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा