जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दोनच दिवस शिल्लक राहिले असताना, जळगाव जिल्ह्यातील शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवारांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा यांनी शनिवारी पाचोऱ्यात हजेरी लावली. मात्र, रोड शो सुरू असताना अचानक छातीत दुखू लागल्याने गोविंदा रोड शो अर्धवट सोडून मुंबईत परतले.
पाचोरा-भडगाव मतदारसंघात महायुतीने विद्यमान आमदार किशोर पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीने दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना मैदानात उतरवले आहे. बहीण-भावातील लढतीशिवाय भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ रिंगणात आहेत. चौरंगी लढतीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या पाचोरा मतदार संघात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत.
हेही वाचा : शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
प्रचारादरम्यान सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी शिंदे गटाने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोचे शनिवारी आयोजन केले होते. त्यानुसार मुक्ताईनगर-बोदवड येथून पाचोऱ्यात हेलिकाॅप्टरने दाखल झाल्यावर गोविंदा यांनी रोड शोमध्ये भाग घेतला. मात्र, छातीत अचानक दुखू लागल्याचे कारण देऊन त्यांनी रोड शो अर्ध्यात सोडून मुंबईकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवारासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.