नाशिक – जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघांसाठी ४९२२ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यास प्रतिबंध आहे. नागरिकांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनासह विविध सामाजिक संस्थांनी केले आहे.

यंत्रणेने आदल्या दिवशी सर्व तयारी पूर्णत्वास नेत मतदानाची सज्जता केली आहे. जिल्ह्यात २६ लाख १४ हजार ९६ पुरुष, २४ लाख ४६ हजार ९६८ महिला आणि १२१ तृतीयपंथी मतदार आहेत. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक (४८३४९५) तर सर्वात कमी मतदार इगतपुरीत (२८०५५९) आहेत. प्रत्येक मतदार संघात तीन संपूर्ण महिला संचलित मतदान केंद्र, एक संपूर्ण अपंग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आणि तीन संपूर्ण युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेच्या संनियंत्रणासाठी ३२८० केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> Maharashtra assembly election 2024 :नाशिक पूर्व मतदार संघांमध्ये पुन्हा हाणामारी; पैसे वाटपाचा आरोप

मतदानासाठी बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत, मात्र शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्ताने ते अन्य ठिकाणी राहत असल्यास तिथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी सहायता कक्ष असणार आहे. केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदारांना अनुक्रमांक शोधून देण्यास मदत करतील. तसेच मतदारांना व्होटर हेल्पलाईन ॲपमधून त्यांचे मतदान केंद्र, मतदार यादी भागातील अनुक्रमांक माहिती करून घेता येईल. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावलीसाठी व्यवस्था, माहितीदर्शक फलक, प्रसाधनगृह, खुर्ची, पाळणाघर, स्वयंसेवक उपलब्ध करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ६४.२१ टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नेण्यासाठी उत्साहात मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा >>> नाशिक : सप्तश्रृंग गड, कसारा, पिंपळगाव मार्गावर आजपासून ई बससेवेच्या अधिक फेऱ्या

पुराव्यासाठी ओळखपत्र बंधनकारक

मतदानासाठी पुरावा म्हणून निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधार कार्ड, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, बँक व टपालाचे छायाचित्र असणारे पुस्तक, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र, केंद्र व राज्य शासनासह सार्वजनिक उपक्रमांकडून निर्गमित केलेले ओळखपत्र, संसद सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्यांचे शासकीय ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आलेले युडीआयडी कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र पुरावा म्हणून मूळ स्वरुपात सादर करावे लागणार आहे. डिजिटल स्वरुपातील पुरावा चालणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

३२८० केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण

जिल्ह्यातील ४९२२ पैकी ३२८० केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर दोन सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. एक कॅमेरा मतदान केंद्रात तर दुसरा केंद्राबाहेर असणार आहे. १०३ संपर्कहिन केंद्रांवरील माहिती बिनतारी यंत्रणेद्वारे मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकडून १५ मतदारसंघातील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येईल. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचे काम सकाळी सहा वाजेपासून सुरू होणार आहे. केंद्रावरील शेवटचे मतदान होईपर्यंत नियंत्रण कक्षाकडून लक्ष दिले जाणार आहे.

सहा मतदान केंद्र संवेदनशील

मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी या तीन मतदारसंघात प्रत्येकी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने तेथे दोन यंत्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात नांदगाव मतदारसंघात तीन, सिन्नरमध्ये दोन आणि चांदवडमध्ये एक अशी एकूण सहा संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदारसंघात तीन केंद्र यानुसार जिल्ह्यात एकूण ४५ केंद्रांवर सर्व कर्मचारी महिला असतील. या केंद्रांवरील मतदान प्रक्रिया महिला पार पाडणार आहेत. तसेच प्रत्येक मतदार संघातील एका केंद्रावर अपंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.