नाशिक : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना बजावण्यात आलेली तडीपारीची नोटीस म्हणजे राजकीय आकस आहे. या नोटीसचा निषेध करुन कारवाई मागे न घेतल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. याबाबत मविआतर्फे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीसाठी बडगुजर हे जिल्ह्याचे स्टार प्रचारक आहेत. नाशिक मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा बडगुजर यांच्या खांद्यावर आहे. वाजे यांच्या प्रचारासाठी बडगुजर वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतांना त्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटीसमुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा…नाशिक : शिक्षक मतदारसंघातील इच्छुकांपुढे आव्हानांचा डोंगर

गुरूवारी महाविकास आघाडीची बैठक शिवसेना कार्यालयात झाली. बैठकीस बडगुजर तसेच राष्ट्रवादीचे गजानन शेलार, नितीन भोसले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मात्र अनुपस्थिती होती. काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड धुळे येथे असल्याने उपस्थित नव्हते. इतर पदाधिकारीही बैठकीस आले नाहीत. बैठकीत प्रचाराची पुढील रणनीती ठरविण्यात आली. ठाकरे गटाला नामोहरम करण्यासाठी पोलीस प्रशासनाने बडगुजर यांच्यावर केलेली कारवाई अयोग्य आहे. तडीपारी गुन्हेगाराची अथवा नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तीची केली जाते. परंतु, बडगुजर हे लोकसेवक तसेच सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या वादातील आहेत.

तडीपारीच्या नोटिसीत एक ते चार गुन्हे दर्शविले आहेत. न्यायालयाने त्यातून बडगुजर यांची मुक्तता केली आहे. एका प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. एकूण १० वर्षाच्या कार्यकाळात बडगुजर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

हेही वाचा…अक्षय्य तृतीयेला नाशिककरांसाठी आंबा महागच

सलीम कुत्ता या गुन्हेगाराबरोबरच्या पार्टी प्रकरणी बेकायदेशीर कृत्य केल्याचा एक गुन्हा यावर्षी त्यांच्यावर दाखल झाला आहे. अशा एका गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर तडीपारीची नोटीस काढणे योग्य नाही. अनेक राजकीय व्यक्तींविरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. परंतु त्यांच्यावर अशी कोणतीही कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही. मग बडगुजर यांच्यावरच अशी कारवाई का, असा प्रश्न पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. यामागे राजकीय आकस हाच घटक मोठ्या प्रमाणात कारणीभूत असून ही गोष्ट लपून राहिलेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा…शिंदे गटाच्या मेळाव्यात ’सलीम कुत्ता‘ नावाने घोषणाबाजी, दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, नितीन भोसले, शरद पवार गटाचे गजानन शेलार, डी. जी. सूर्यवंशी, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi protests externment notice against shiv sena uddhav thackeray district chief sudhakar badgujar in nashik psg