लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : जळगावमध्ये भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, तर रावेरमधून खासदार रक्षा खडसे यांना महायुतीकडून भाजपने उमेदवारी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीकडून कोणाला निवडणूक आखाड्यात उतरवायचे, यावर अजूनही काथ्याकूट सुरूच आहे. ठाकरे गटाकडून भाजपने उमेदवारी नाकारलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचे नाव चर्चेत आले असून, रावेरसाठी शरदचंद्र पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील, अॅड. रवींद्र पाटील यांची नावे घेतली जात आहेत.
जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. जळगावच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ व रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याकडून जिल्ह्यात गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे. भाजपने खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारुन स्मिता वाघ यांना संधी दिली, दुसरीकडे ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावावर ठाकरे गटाकडून विचार करण्यात येत असल्याचे समजते. याशिवाय जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, अमळनेर येथील अॅड. ललिता पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. संपदा पाटील यांनी मतदारसंघात विविध पदाधिकार्यांशी तसेच कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप अंतर्गत नाराजी दिसून येत आहे. त्याचा लाभ उठवण्याची ठाकरे गटाची योजना आहे.
आणखी वाचा-शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता
रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असून, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचेही मत उमेदवारीसंदर्भात जाणून घेण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. आमदार एकनाथ खडसेंनीही मत मांडत आमदार चौधऱींनी सुचविलेल्या आथिकदृष्ट्या सक्षम उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाला दुजोरा दिल्याचे सांगितले जाते. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, मुक्ताईनगरचे विनोद सोनवणे, तृप्ती बढे यांची नावेही बैठकीत पुढे आल्याने कोणते नाव निश्चित होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
उद्धव ठाकरे सात मे रोजी जळगाव, रावेरमध्ये
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सात मे रोजी जळगाव मतदारसंघात दोन आणि रावेर मतदारसंघात एक प्रचारसभा होणार आहे. उमेदवार जाहीर नसले तरी पदाधिकारी व कार्यकर्ते ठाकरे गटाचे मशाल चिन्ह घराघरांपर्यंत पोहोचवत असल्याचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.