भुसावळ – महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे दोन ते पाच फेब्रुवारी या कालावधीत जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलांतील एक हजार ८३ अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात ३५३ महिला तर, ७३० पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे.
वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे राहणार आहेत.
हेही वाचा – नाशिक : गोदापात्र स्वच्छतेला मुहूर्त, प्रगट दिनाचे औचित्य साधून मोहीम
हेही वाचा – नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्णत्वास, कमी मतदानामुळे अधिक चुरस
या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण पाच फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता एकलव्य क्रीडा संकुलात कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी संचालक (संचालन) संजय ताकसांडे राहणार आहेत. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून जळगाव परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर हे परिश्रम घेत आहेत.