जळगाव : महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या नियमबाह्य असल्याने कामगारांनी प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी चर्चेला बोलावल्यानंतर संवाद करण्यात आला. मात्र, त्यातून काहीही सकारात्मक निष्पन्न न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगार महासंघातर्फे करण्यात आला आहे.
प्रशासकीय व विनंती बदल्यांसंदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद आहे. मात्र, या परिपत्रकाला महावितरणच्या जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदल्यांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञपदाच्या १५ कर्मचार्यांचे आणि तंत्रज्ञपदाच्या चार कर्मचार्यांच्या बदल्या नियमबाह्य करण्यात आल्या आहेत. २०२३ मध्ये जळगाव विभागाने कामगारांच्या नियमबाह्य बदल्या केल्या आहेत, तसेच कामगारांची ज्येष्ठता डावलून अन्याय केला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी चर्चेसाठी बोलावले. त्यावेळी मागण्यांसंदर्भात सांगण्यात आले. मात्र, त्यावर प्रशासनातर्फे ठोस असे सकारात्मक काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आता आंदोलन कायम करून ते तीव्र करण्याचा कामगार महासंघातर्फे निर्णय घेण्यात आला आहे.