नाशिक : वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत असल्याचा फटका महावितरणच्या वीज वितरण प्रणालीला बसत आहे. गुरुवारी रात्री अनेक भागात झाड तसेच फांद्या कोसळून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याच सुमारास वीज खांब कोसळल्याने गंगापूर रस्त्यावरील अयाचितनगर, चैतन्यनगर, मधुकमलनगर भाग अंधारात बुडाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.
सलग तीन दिवसांपासून शहर परिसरात परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अनेक भागात पाऊस कोसळला. त्याची झळ वीज वितरण प्रणालीला बसली. रात्री अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. कुठे दोन तास तर, कुठे चार तास वीज गायब होती. महावितरणच्या अभियंत्यांनी शर्थीने प्रयत्न करीत वीज पुरवठा सुरळीत केला. याच सुमारास गंगापूर रस्त्यावरील अयाचितनगर, अरिहंत रुग्णालय, चैतन्यनगर, मधुकमलनगर भागात वीज पुरवठा करणाऱ्या खांबांवर झाड कोसळले. यामुळे दोन, तीन खांब भुईसपाट झाले. रात्रभर हा परिसर अंधारात बुडाला. रात्री पाऊस आणि चिखलात खांबांची उभारणी करणे अशक्य होते. त्यामुळे महावितरणची यंत्रणा सकाळपासून युध्दपातळीवर कामाला लागली. सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. गुरुवारी सायंकाळी सात वाजेपासून उपरोक्त भागात खंडित झालेला वीज पुरवठा शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. वीज खांब उभारणी व तारांच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच चाचणी होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल, असे. महावितरणचे सहायक अभियंता मनिष पगारे यांनी सांगितले.
वारंवार वीज खंडित होण्याची समस्या
गंगापूर रस्त्यावरील अयाचितनगर, चैतन्यनगर, मधुकमलनगर, अरिहंत रुग्णालय परिसरात वारंवार वीज पुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. दिवसभरात आठ ते १० वेळा वीज पुरवठा खंडित होतो. कधी १० ते १५ मिनिटांत तर कधी अर्धा-एक तासाने तो पूर्ववत होतो. वारंवार वीज गायब होत असल्याने इलेक्ट्रॉनिक व इलेक्टिक उपकरणांची हानी होण्याची शक्यता असते. या भागात झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडत असल्याने पुरवठा खंडित होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.