अनिकेत साठे, लोकसत्ता
नाशिक – भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी देश पातळीवर अनेक प्रयत्न होत आहे. रोजगार निर्मिती अथवा स्वयंरोजगार पुरवून रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.
हेही वाचा >>> नाशिक: सारंगखेडा पुलाला भगदाड, नंदुरबार-धुळे वाहतूक मार्गात बदल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, येवला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे रविवारी पीएम स्कील रन तसेच २०२३ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान सोहळा बाभूळगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झाला. यावेळी ते बोलत होते. महायुती सरकार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अनेक योजना राबवित आहे. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगार प्राप्ती हा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने शनिवारी नाशिक शहरातील एमईटी भुजबळ नॉलेज सिटी येथे रोजगार मेळावा आयोजित कऱण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नाशिक शहरात ५३४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी
एकीकडे उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची कमतरता असून, दुसरीकडे लोकसंख्येचा एक मोठा वर्ग असा आहे की, ज्याच्याकडे थोडी किंवा अजिबात नोकरीविषयक कौशल्ये नाहीत. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाला तोंड देण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेल्या गतिशील आणि उद्योजक तरुणांना तयार करणे आवश्यक आहे. कौशल्य निर्माणाकडे उत्पादनाची परिणामकारकता आणि कामगारांचे त्यातील योगदान सुधारण्याचे एक साधन म्हणून पाहिले जाऊ शकते. वाढती बाजारपेठ आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने कौशल्य विकासास प्राधान्य दिले जात असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विषयक शिक्षण घेणे काळाची गरज बनली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी रन फॉर स्कील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.