नंदुरबार : जिल्ह्यातील महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून भाजपचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर युती होणार नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे. त्यामुळे भाजप नंदुरबार जिल्ह्यात स्वबळावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहेत. याच वादातून दोन्ही महायुतीतील घटकपक्षांचे नेते असतांना देखील वेळप्रसंगी विरोधाची भूमिका घेत थेट विरोधकांना मदत करताना दिसून आले आहे. त्यामुळे महायुतीमधील हे दोन्ही नेते एकत्र लढतील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

याआधीही मुख्यमंत्री उपमुख्यंमत्र्यांसह वरिष्ठांनी दोघा नेत्यांना समोरासमोर बसवूनही या दोघांमधील कुरघोडी न संपल्याने हा वाद वाढतच गेल्याचे दिसून आले आहे.याच वादाची परिणती म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर युती होणार नसल्याची भूमिका भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी जाहीर केली. मित्रपक्षांना याआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समजावूनही त्यांनी केलेला विश्वासघात पाहता अशा मित्रपक्षांबरोबर युती होणे शक्य नसल्याचे डाॅ. गावित यांनी सांगितले. आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचीच एकहाती सत्ता येईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

मंत्री डाॅ. गावित यांच्या निवासस्थानी तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवड कार्यक्रमाप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आम्ही ज्या पक्षात जातो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहतो, हे आतापर्यंत दाखवून दिले आहे. आम्ही विरोधात प्रचार केला, बाजूने प्रचार केला, अशा चर्चा आमचे विरोधक पसरवित असतात. परंतु, आम्ही तसे केलेले नाही. जर केले असते तर पक्षाचे किमान तीन लोक पराभूत झालेले दिसले असते. तथापि, आम्ही आमची शक्ती फक्त आणि फक्त पक्षासाठी वापरत आलो आहोत. आणि पक्षवाढीसाठीच लावणार आहोत, असे डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले.