अनिकेत साठे, लोकसत्ता
नाशिक : तीनही पक्षांची दावेदारी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीने आता वादरहित नवा चेहरा शोधण्याचे काम हाती घेतले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यातील जागेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव लावून धरले होते. या नावाविषयी केवळ शिंदे गटच नव्हे तर, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातून नकारात्मक सूर उमटला. यामुळे अखेरीस नवीन चेहरा मैदानात उतरविण्याच्या विचाराप्रत नेतेमंडळी आली आहे.
हेही वाचा >>> एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका
महाविकास आघाडीने नाशिकच्या जागेसाठी ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव १२ दिवसांपूर्वीच जाहीर केले. ते प्रचाराला लागले असताना महायुतीला अजूनही उमेदवार ठरवता आलेला नाही. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कित्येक दिवस मुंबईत तळ ठोकूनही प्रगती झाली नाही. याच कालावधीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव दिल्लीतून भाजप नेत्यांनी निश्चित केल्याची माहिती समोर आल्यावर वादाने नवीन वळण घेतले. शिंदे गटाला जागा देण्यास उघडपणे विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी भुजबळांना सुप्त विरोध केला. ब्राह्मण महासंघाने त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला. सकल मराठा समाजाने भुजबळांना उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम महायुतीला सर्वत्र भोगावे लागतील, असा इशारा दिला.
तीनही पक्षांकडून सर्वेक्षण
या घडामोडीत तीनही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये परस्परांविषयी तेढ निर्माण झाली. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात भुजबळ यांच्या नावाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने महायुतीने वादविरहित नव्या चेहऱ्याची पडताळणी सुरू केली असून शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटातील अशा काही नावांची चाचपणी होत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. त्यातील कल लक्षात घेऊन नाशिकच्या जागेवर महायुतीतर्फे नवीन उमेदवार निश्चित करण्याचे धोरण वरिष्ठांनी स्वीकारले आहे, असे शिंदे गटाच्या नेत्याकडून सांगण्यात आले. या संघर्षांत नाशिकची जागा शिंदे गटाकडे राहील की, मित्रपक्षाला देण्याची वेळ येईल, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही.