नाशिक : लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्षात सुरु असलेल्या टोकाच्या संघर्षामुळे दाटलेल्या शांततेचे प्रतिबिंब राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवास व कार्यालय परिसरावरही पडले आहे. आठ दिवस मुंबईत तळ ठोकणारे भुजबळ हे गुढीपाडव्यानिमित्त नाशिकमध्ये आले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे येथे आल्यावर जंगी स्वागताचे नियोजन समर्थकांनी केले होते. परंतु, उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याने त्यांचाही हिरमोड झाला. ही जागा कुणाला मिळणार हे अस्पष्ट आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपानंतर जशी अकस्मात शांतता झाली, तसेच चित्र राष्ट्रवादीच्या गोटात पहायला मिळत आहे. बुधवारी भुजबळ यांनी निकटवर्तीय पदाधिकारी तसेच कामानिमित्त आलेल्यांची भेट घेतली. नाशिकच्या जागेच्या तिढ्याबाबत मौन बाळगणे पसंत केल्याचे चित्र आहे.
महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेवरून मध्यंतरी बराच संघर्ष झाल्यानंतर कुठलाही तोडगा न निघता वातावरण अकस्मात शांत झाले. सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर आगपाखड करुन भाजपने ही जागा आपल्याकडे राखण्याचा आग्रह धरला होता. आपल्या हक्काच्या जागेवर उमेदवार जाहीर करावा, यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही काहीच घडले नाही. याच काळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दिल्लीतून भाजप नेत्यांनी आपले नाव निश्चित केल्याची माहिती दिली होती. यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला. परंतु, तो त्यांनी जाहीरपणे दर्शविला नाही. ब्राम्हण महासंघ, सकल मराठा समाज यांच्याकडून भुजबळांविरोधात थेट भूमिका घेतली गेली. महायुतीत बेबनावाचे जाहीर दर्शन घडल्यानंतर तीनही पक्षातील पदाधिकारी व नेते अकस्मात शांत झाले. वादामुळे महायुतीने नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केल्याचे सांगितले गेले. पडद्याआडून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. परंतु, त्यातून अद्याप काही ठोस निष्पन्न झालेले नाही.
हेही वाचा…श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी
या घटनाक्रमात मुंबईत ठाण मांडून असणारे छगन भुजबळ यांचे गुढीपाडव्यानिमित्त शहरात आगमन झाले. सायंकाळी येवल्यातील कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. बुधवारी ते दिवसभर भुजबळ फार्ममध्ये होते. कामानिमित्त आलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली. समता परिषदेचे प्रमुख पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कडलग अशा निकटवर्तीयांशी संवाद साधल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीच्या तुरळक पदाधिकाऱ्ऱ्यांची ये-जा सुरू होती. नाशिकच्या जागेच्या तिढ्याबाबत त्यांनी संवाद साधणे टाळले. भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी स्वागताची तयारी केली होती. हा पेच कधी सुटणार, याकडे त्यांचे लक्ष आहे. भुजबळ फार्म कार्यालयात नेहमीच्या तुलनेत अधिक शांतता जाणवत आहे. समता परिषदेचे पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.