‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ वक्तृत्व स्पर्धेच्या मुंबई येथे १७ मार्च रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीत नाशिक विभागातून येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयाची महिमा ठोंबरे हिने प्रवेश केला आहे.
येथील प्रसाद मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी रंगली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे कार्याध्यक्ष तथा विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर उपस्थित होते. अंतिम फेरीत उत्तर महाराष्ट्रातील निशिगंधा अभंग, महिमा ठोंबरे, वृषाली राणे, हर्ष औटे, सिध्दी देशपांडे, गायत्री वडघुले, निशिता पेंढारकर, शुभम हिरे, श्रृती देशमुख या उत्तर महाराष्ट्रातील नऊ स्पर्धकांच्या वक्तृत्व कलेचा कस लागला. प्रत्येकाने आपल्यातील वक्तृत्वविषयक गुणवत्तेचे दर्शन घडवले. यावेळी स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना ठाकूर यांनी बदलत्या युगात आजची पिढी समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असून ही समाधानाची गोष्ट असल्याचे सांगितले. उत्तम वक्तृत्वासाठी अभ्यास, अवांतर वाचन महत्वाचे आहे. आजच्या पिढीचा स्वर आश्वासक असून ऐकणं हे दुर्मीळ होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वक्ता म्हणून पाठांतर अपेक्षित आहे. मात्र ती घोकंमपट्टी नको. दिलेल्या कालावधीत मला माझे विचार मांडायचे या एकाच विचाराने स्पर्धक एका लयीत बोलत राहिले. समोरच्या प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेत आपणास बोलता यायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.
लेखक आणि परीक्षक दत्ता पाटील यांनी आजची पिढी आश्वासक असल्याचे मत मांडले. झुंडशाहीच्या उन्मादापुढे काहुर माजविणाऱ्या वातावरणात अस्थिरता असतांना यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वाना शांतता हवी, संवाद हवा आहे. यामुळे देश सुरक्षित हातात जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. परीक्षक यशश्री रहाळकर यांनी प्रत्येक विषयावर स्पर्धक छान व्यक्त होत असले तरी प्रत्येकाकडे अधिक मुद्दे असायला हवेत, याकडे लक्ष वेधले. आधीचा स्पर्धक एखाद्या मुद्यावर बोलला असेल तर पुढील स्पर्धकाने नवीन मुद्दे मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे शहराचे मुख्य वितरक देवदत्त जोशी यांनी केले.
नाशिक विभागीय अंतिम फेरीचा निकाल
* प्रथम – महिमा ठोंबरे (हं. प्रा. ठा. कला महाविद्यालय, नाशिक)
* द्वितीय – हर्षद औटे (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)
* तृतीय – गायत्री वडघुले (के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक)
* उत्तेजनार्थ – श्रृती देशमुख (प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जळगाव)
* उत्तेजनार्थ – शुभम हिरे (भोसला सैनिकी महाविद्यालय, नाशिक)
‘पिंताबरी कंटवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व’स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.
नाशिक विभागीय अंतिम फेरीतील विजेत्यांसह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे कार्याध्यक्ष आणि विश्वास बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, लेखक आणि परीक्षक दत्ता पाटील, यशश्री रहाळकर, देवदत्त जोशी.