नाशिक : मकर संक्रातीच्या दिवशी पमकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला असला तरी त्यांच्या उत्साहावर वाऱ्याने विरजण टाकण्याचे काम केले. दुपापर्यंत म्हणावा तसा वाराच नसल्याने पतंगी गिरक्या घेत पुन्हा खालीच झेपावत होत्या. पतंगाला पुन्हा आकाशात पाठविताना पतंगप्रेमींची चांगलीच दमछाक झाली. सायंकाळी काही प्रमाणात वारा आला आणि पुन्हा पतंग आकाशात पाठवण्याची धडपड सुरू झाली. परंतु, या दिवशी आकाशात होणारी पतंगांची गर्दी आणि सर्वत्र ‘गै बोलो रे धिन्ना..’चा दुमदुमणारा आवाज क्षीण झाल्याचे दिसले. पतंगोत्सवाची जय्यत तयारी करणाऱ्यांचा यामुळे हिरमोड झाला. जिल्हय़ातील येवला पतंगोत्सव नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडला.
मकरसंक्रांत म्हणजे पतंगोत्सव. हा उत्सव बच्चे-कंपनीबरोबर आबालवृद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात. त्याचे प्रत्यंतर आदल्या दिवशी पतंग, मांजा खरेदीच्या गर्दीवरून आले होते. शहरातील बाजारपेठेत मिकी माऊस, गरुड, विमान, धोबी, वटवाघूळ आदी प्रकारच्या पतंगांची खरेदी झाली होती. त्यामुळे मकरसंक्रांतीला पतंगप्रेमींची एकच धूम राहणार असल्याचे चित्र होते. परंतु, मंगळवारी तसे घडले नाही. वारा नसल्याने पतंगोत्सवाचा अपेक्षित आनंद लुटता आला नाही. सकाळी बच्चे कंपनी इमारतीच्या गच्चीवर, खुल्या मैदानात पोहोचली होती. पतंग उडविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. वाऱ्याअभावी त्यांची दमवणूक झाली. बच्चे कंपनीप्रमाणे युवक आणि घरातील बडय़ा मंडळींना पतंग आकाशात पाठविणे अवघड गेले. वारा नसतांना पतंग उडविणे जिकीरीचे ठरते. अनेकदा प्रयत्न करावे लागतात. यामुळे काही वेळात हातही दुखायला लागतात. बहुतेक पतंगप्रेमींना या समस्येला तोंड द्यावे लागले.
कागदी पतंग उडविणे अवघड झाले असताना आकाराने मोठय़ा विविध प्रकारच्या पतंगांचा विचार कित्येकांना सोडून द्यावा लागला. मकरसंक्रांतीसाठी अनेकांनी पांडा, बरेली, फरिदबेग, सहा तारी, नऊ तारी अशा मांजाची खरेदी केली होती. इतकेच नव्हे तर मध्यवस्तीतील वाडे आणि काही इमारतींवर खास ढोल अथवा टेपवर गाण्याची व्यवस्था करण्यात आली. काही कुटुंबीयांनी दिवसभर गच्चीवर थांबण्यासाठी भोजन व्यवस्था केली. या सर्वाच्या उत्साहावर वाऱ्याने विरजण टाकले. खरे तर मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाश विविधरंगी पतंगांनी भरून जाते. परस्परांच्या पतंगी काटण्याची स्पर्धा लागते. एकदा का प्रतिस्पध्र्याची पतंग कापली तर लगेच त्या त्या गच्चीवरून ‘गई बोलो रे धिन्ना..’च्या आरोळ्या ठोकल्या जातात. सायंकाळी उशिरापर्यंत या आरोळ्या दुमदुमत असतात. मात्र यंदा नेहमीचा उत्साह या वर्षी अभावाने दिसला. वारा नसल्याने पतंग उडवितानाच अनेकांची दमछाक झाली. बरीच प्रतीक्षा करूनही वाऱ्याचा वेग वाढत नसल्याने पतंग उडविण्याचा आनंद लुटता आला नसल्याची अनेकांची खंत होती. काही पतंगप्रेमी सायंकाळी मनाजोगता वारा येईल या आशेवर गच्चीवर तग धरून होते.
येवल्यातील पतंगोत्सवात केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग
येवल्याची पैठणी आणि पतंग महोत्सव देशात प्रसिद्ध आहे. त्याचा केंद्रीय कौशल्य विकासमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आनंद घेतला. या पतंग महोत्सवाने त्यांनाही सुखद धक्का बसला. आपण प्रथमच पतंगोत्सवाचा आनंद घेतला, खूप समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. येवला हे पतंगबाजाचे गाव. आबालवृद्धांसह बच्चे कंपनीने पतंग उडविण्याचा आनंद घेतला. वारा कमी असल्याने नेहमीसारखा तो मिळाला नाही. सलग तीन दिवस चालणारा पतंगोत्सव बघण्यासाठी बाहेरगावहून नागरिक येतात. पतंगोत्सवात नव्याने भर पडली ती येवल्याचे ‘गोल्डमॅन’ पंकज पारख यांच्या पतंगाच्या शर्टची. पतंगाच्या शर्टवर अनेक छोटय़ा छोटय़ा सप्तरंगी पतंग आहेत. जरी आणि विणकामातून आबालवृद्ध पतंग उडवत असल्याचे चित्र रेखाटले आहे. विणकामाच्या शर्टची किंमत सुमारे नऊ हजारांच्या घरात आहे. संक्रांतीला हा शर्ट परिधान करत पारख यांनी पतंग उडवली.
दोन किलोमीटर प्रतितास
नववर्षांत सलग दोन आठवडे थंडीने मुक्काम ठोकला. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर होत असतो. मागील तीन-चार दिवसांत वाऱ्याचा वेग मंदावला. यामुळे तापमानात वाढ होऊन ते १० अंशांवर पोहोचले. वातावरणातील गारवा कमी करणाऱ्या वाऱ्याचा पतंगोत्सवावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले. मंगळवारी दोन किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग होता. हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार तो अतिशय नगण्य आहे. मंदावलेला वारा पतंग न उडण्याचे कारण ठरला.
नायलॉन मांजा हद्दपार
नायलॉन मांजामुळे होणारे अपघात आणि पक्ष्यांची होणारी हानी रोखण्यासाठी यंदा पोलिसांसह अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे आले. काही दिवसांपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात येत होती. पोलिसांनीही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू केल्याने संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजाचा वापर फारसा झाल्याचे दिसून आले नाही.