मालेगाव : गरीब कुटूंबांमधील १२ तरुणांच्या बँक खात्यांद्वारे १२५ कोटींची उलाढाल झाल्याप्रकरणी संशयित सिराज अहमद मेमन यास छावणी पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी मालेगावात दाखल झालेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या पथकानेही (ईडी) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
नाशिक मर्चंट सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेत १२ तरुणांच्या नव्यानेच उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये जेमतेम २२ दिवसात तीन ते १६ कोटींची ऑनलाइन आर्थिक उलाढाल झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. या उलाढालीशी आमचा काहीही संबंध नाही तसेच शहरातील सिराज अहमद मेमन नामक व्यापाऱ्याने आमची दिशाभूल करून यात फसवणूक केल्याची तक्रार या तरुणांनी केली होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्या कानावर त्यांनी ही बाब घातल्यावर या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सिराज यास अटकही करण्यात आली आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी मालेगावी भेट देत या तरुणांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. देशभरातील नऊ राज्यांमधील २०० हून अधिक बँक शाखांमार्फत ही रक्कम मालेगावातील तरुणांच्या बँक खात्यात पाठवण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करण्यात आली आणि हवालाच्या माध्यमातून ही रक्कम ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या सर्व तरुणांना कोणताही थांगपत्ता लागू न देता संशयिताने ही सर्व उलाढाल घडवून आणली. ही एक साखळी असून संशयित सिराजच्या मागे मोठा हस्तक असल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ईडीचे पथक मालेगावात दाखल झाले. पथकाने संशयित सिराजची चौकशी सुरू केली आहे. त्याच्या निवासस्थानी देखील पथकाने भेट दिली.
हेही वाचा : नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
ईडीच्या पथकाने सिराजची चौकशी सुरू केली आहे. अटक केलेल्या संशयित सिराजच्या एका साथीदाराचीही पोलीस चौकशी करीत आहेत.
अनिकेत भारती (अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव)