मालेगाव : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मालेगावात बांगलादेशी व रोहिंगे मुसलमानांचे खरेच वास्तव्य आहे काय, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकरवी खातरजमा करावी, जर एकही बांगलादेशी वा रोहिंग्याचे असे वास्तव्य आढळून आले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे आव्हान माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख आसिफ शेख यांनी येथे दिले.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईत बांगलादेशी व रोहिंगे मुसलमानांची संख्या वाढत असल्याचे विधान करत चिंता व्यक्त केली होती. यावेळी राणे यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादामुळे मालेगावातही बांगलादेशी व रोहिंगे मुसलमानांच्या वस्त्या वाढत असल्याचा संदर्भ दिला होता. त्यास आसिफ शेख यांनी तीव्र आक्षेप घेत हा मालेगावला बदनाम करण्याचा तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली. मालेगावात एकाही बांगलादेशी किंवा रोहिंगे मुसलमानांचे वास्तव्य नसल्याचा दावा देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
हेही वाचा : इगतपुरीतील तीन कुख्यात गुन्हेगार ताब्यात
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राणे यांचा निषेध करण्यात आला. तसेच येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना निवेदन देऊन राणे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने कारवाई न केल्यास राणे यांना मालेगावात पाय ठेवू दिला जाणार नाही, असा इशाराही शेख यांनी दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज उमर, शकील अहमद, फारूक कुरेशी, रफिक अहमद, अस्लम अन्सारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा : हरियाणा, दिल्ली यांना विजेतेपद; नाशिक येथील २४ वी राष्ट्रीय दोरउडी स्पर्धा
मालेगावची बदनामी होत असताना पालकमंत्री गप्प का ?
जनमत विरोधात जात असल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुका जिंकणे अवघड असल्याची खात्री भाजपला वाटू लागली आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये नाहक वाद निर्माण करून राजकीय लाभ उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. बांगलादेशी व रोहिंग्यांच्या वस्त्या वाढत असल्याची विधाने करणे, हा त्याचाच भाग असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. अशा विधानांमुळे मालेगावची बदनामी होत असतानाही नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी याविषयी मौन पाळणे पसंत केले आहे, अशी टीका शेख यांनी केली. केवळ सत्ताप्रिय असल्यामुळेच या विषयावर पालकमंत्री बोलत नाहीत. हिंदू-मुस्लिमांच्या हिताचे त्यांना काहीच पडले नाही, असा आरोपही शेख यांनी केला आहे.