मालेगाव : महापालिकेने पाणीपट्टी दरात दरवर्षी होणारी पाच टक्के दरवाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे आक्रमक भूमिका घेण्यात आली असून लोटांगण आंदोलन करण्यात आले. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरून समितीच्या कार्यकर्त्यांनी जवळपास दोन किलोमीटर लोटांगण घालत हे आगळे वेगळे आंदोलन केले.
येथील गांधी पुतळ्यापासून महापालिकेपर्यंत करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी केले. यावेळी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी निदर्शने केली. तसेच आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन दिले. महापालिका क्षेत्रात पाणीपट्टी दरात दरवर्षी होणारी पाच टक्के वाढ रद्द करावी, इस्लामाबाद भागातील मोडकळीस आलेली मुख्य जलवाहिनी बदलण्यात यावी, सरदार मार्केटपासून ते उर्दू लायब्ररीपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक वाहनतळांची व्यवस्था करावी, आदी मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करुनही पालिकेकडून पूर्तता होत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा – जळगाव महापालिकेचा भोंगळ कारभार, रस्ते कामात जलवाहिन्यांचे व्हाॅल्व्ह बुजविण्याचा प्रकार
याप्रसंगी आंदोलकांना सामोरे जात आयुक्त जाधव यांनी समितीने केलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. या मागण्यांबद्दल संबधित विभागांकडून सविस्तर माहिती घेऊन दोन जानेवारी रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले. आंदोलनात निखिल पवार, देवा पाटील, भरत पाटील, जितू देसले, कैलास तिसगे, सुशांत कुलकर्णी आदी सामील झाले होते.