आगामी काळात प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरींची खोली वाढविणे या उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे. अल निनोच्या प्रभावाने पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करू शकते हे लक्षात घेऊन प्रशासनाने १५०१ गाव-वाड्यांना संभाव्य टंचाईची झळ बसू शकते असे गृहीत धरून २० कोटी ६७ लाख रुपये खर्चाचा विशेष कृती आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक १२२ गावे आणि १३ वाड्यांतील उपायांवर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. उर्वरित अनेक भागात टँकरने पाणी पुरवठ्यावर यंत्रणेची भिस्त आहे.
गेल्या वर्षी पाणी टंचाई कृती आराखडा आठ कोटी रुपयांचा होता. यंदा धरणांची स्थिती चांगली असल्याने त्यात घट करून तो सहा कोटींचा सादर करण्यात आला होता. तथापि, अल निनोच्या प्रभावाने पावसाचा हंगाम लांबणीवर पडणार असल्याचे अंदाज वर्तविले गेल्यावर शासनाने संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर विशेष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार धरणांमध्ये उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात कपातही पूर्वीच सुचविली गेली आहे. त्याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी ग्रामीण भागात काय स्थिती उद्भवू शकते, याचा अंदाज बांधून जिल्हा परिषदेने पाणी टंचाईबाबत नव्याने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. यात ६१३ गावे व ८५९ वाड्यांचा समावेश आहे. पाणी टंचाईची झळ कमी-अधिक प्रमाणात सर्व तालुक्यांना जाणवणार असल्याचे यंत्रणेने गृहीत धरले आहे. यामध्ये बागलाणमधील ७९ गावे व १५ वाड्या, चांदवड (२७ गावे, ८७ वाड्या), दिंडोरी (४० गावे, ११ वाड्या), इगतपुरी (१८ गावे, ३७ वाड्या), कळवण (४८ गावे, चार वाड्या), देवळा (१० गावे, पाच वाड्या), मालेगाव (१२२ गावे व १३ वाड्या), नांदगाव (३२ गावे, १६४ वाड्या), नाशिक (नऊ गावे, सहा वाड्या), त्र्यंबकेश्वर (१४ गावे, ३० वाड्या), निफाड (नऊ गावे), पेठ (२४ गावे, १० वाड्या), सुरगाणा (६४ गावे, ६७ वाड्या), सिन्नर (५३ गावे, ३८४ वाड्या), येवला (५३ गावे, ३६ वाड्या) असे प्रस्तावित करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा >>>अजित पवार भाजपाबरोबर जाणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही सर्वजण…”
पाणी टंचाईचे संकट निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांमध्ये ३७५ गावे व ८५९ वाड्यांना ३१९ टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. १६० गावे व २७ वाड्यांमध्ये खासगी विहीर अधिग्रहित केल्या जातील. १७ गावांमध्ये विहिर खोल करण्याची तयारी आहे. ही सर्व गावे कळवण तालुक्यातील आहेत.
आराखडा जिल्ह्याचा की मालेगावचा ?
पाणी टंचाई कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाय योजनांवर नजर टाकल्यास प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या मालेगाव तालुक्यावर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी प्रगतीतील नळ योजना पूर्ण करण्याची निकड आहे. मालेगाव तालुक्यातील २७ गावांतील व दोन वाड्यातील नळ योजना पूर्ण करण्याचा आराखड्यात समावेश आहे. उर्वरित एकाही तालुक्यातील नळ योजनेचा विचार झालेला नाही. इतकेच नव्हे तर, विंधन विहिरी घेतानाही केवळ मालेगावला प्राधान्य मिळाले. या तालुक्यात ३४ गावांमध्ये विंधन विहिरी घेण्याचे नियोजन आहे. उर्वरित जिल्ह्यात कुठेही त्या उपायाचा विचार दिसत नाही. मालेगावमध्ये ४० गावे व दोन वाडीत खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जातील. २२ गावे व नऊ वाड्यांवर आठ टँकरने पाणी पुरवठा प्रस्तावित आहे.
हेही वाचा >>>जळगाव: विधी अभ्यासक्रमातील दोन विषय उत्तरपत्रिकांची फेरतपासणी; बैठकीत उमवि कुलगुरुंचा निर्णय
जिल्ह्यातील प्रस्तावित उपाययोजना
- प्रगतीतील नळयोजना पूर्ण करणे – २९ गाव-पाडे
- विंधन विहिरी – ३४ गावे (१५ लाख ३० हजार अपेक्षित खर्च)
- विहिरी खोल करणे – १७ गावे (१७ लाख रुपये)
- खासगी विहिरींचे अधिग्रहण – १८७ गाव-पाडे (एक कोटी ४० लाख रुपये)
- टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा – १२३४ गाव-पाडे (१८ कोटी ९४ लाख रुपये)