मालेगाव : एक लाख कोटी रुपये खर्च झाले तरी नार व पार नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या बीडपर्यंत नेण्यात येईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केले. या वक्तव्याविरोधात गिरणा खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नार, पारसह अन्य पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या तापी-गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी काही वर्षे लढा देणाऱ्या वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे या वक्तव्याबद्दल अजित पवारांचा निषेध करण्यात आला आहे. तापी-गिरणा खोऱ्यातील हक्काचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न उपस्थित करीत राज्यकर्त्यांचा हा डाव उधळून लावू, असा इशारा समितीने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि नांदगाव (कसमादेना) तालुक्यातील हक्काचे पाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अगोदरच गोदावरी खोऱ्यात पळविले आहे. त्या विरोधात ‘कसमादेना’ भागात मध्यंतरी आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मंत्रालयात आयोजित बैठकीत मांजरपाडा प्रकल्पाच्या बदल्यात वांजुळपाणी तथा मांजरपाडा-२ हा प्रकल्प मंजूर करण्याचे व दोन्ही प्रकल्पांचे काम एकाच वेळी सुरू करण्याची हमी तत्कालीन जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

हेही वाचा : नाशिक : चाऱ्यासाठी दाही दिशा, जनावरांना सहा महिने पुरेल इतकीच उपलब्धता

मात्र अकरा वर्षे उलटल्यावरही या हमीची पूर्तता झालेली नाही, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. तसेच तापी-गिरणा खोऱ्याला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडलेले अजित पवार आता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘कसमादेना’चा हक्क असलेले नार, पारचे पाणी गोदावरी खोऱ्याद्वारे बीडपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देत सुटले आहेत, अशी टीका समितीने केली.

याआधी भुजबळ यांच्या अट्टाहासामुळे मांजरपाडा प्रकल्प पळविण्यात आला. आता धनंजय मुंडे यांच्यासाठी पुन्हा नार-पारचे पाणी पळविण्याचा डाव दिसत आहे. हा ‘कसमादेना’ भागावर अन्याय असून तापी-गिरणा खोऱ्यातील मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, भारती पवार यांसह अन्य नेते राजकीय अस्तित्वासाठी त्याला मूकसंमती देत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे समितीने म्हटले आहे.

हेही वाचा : मालेगावात आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा, टंचाईसदृश्य परिस्थितीचा फटका

पाणी प्रश्न सोडविणाऱ्या पक्षाला मतदान

गोदावरी खोऱ्यात दमणगंगा, पिंजाळ,वाघ आदी पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या सर्व नद्यांचे पाणी वळवून गोदावरी खोऱ्यात नेणे शक्य आहे. ते न करता तापी-गिरणा खोऱ्यातील नार, पार आदी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे हे नैसर्गिक तत्वाच्या विरोधात आहे. शिवाय सतत दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या आणि पाण्याच्या दृष्टीने तुटीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणा-तापी खोऱ्यातील जनता हक्काचे पाणी मिळण्यासाठी कित्येक वर्षांपासून नार, पार प्रकल्प व्हावा, याकरीता संघर्ष करीत आहे, याकडेही समितीने लक्ष वेधले आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जो पक्ष हा पाणी प्रश्न सोडवेल, त्याच पक्षाला मतदान करण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात येईल. पाणी हाच पक्ष समजून लढ्याची मशाल पेटवली जाईल, असा इशारा वांजुळपाणी संघर्ष समितीचे प्रा. के. एन. अहिरे, विश्वासराव देवरे, निखिल पवार आदींनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon vanjulpani sangharsha samiti asks ncp ajit pawar about releasing water from tapi basin to godavari river css