लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील २६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मालेगाव येथील जुन्या बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.
माळमाध्यावरील २६ खेड्यांमध्ये महिन्यातून केवळ दोन वेळा पिण्याचे पाणी मिळते. त्यातही नियमितता नाही. वीजपुरवठा खंडित होणे, पंप बिघाड,पाईपलाईन फुटणे अशी कारणे कायमच पाचवीला पूजलेली आहेत. तीव्र आंदोलनासाठी २६ खेड्यांमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. शासनाला निवेदन देऊन, आंदोलन करूनही समस्या सुटत नसल्याने २६ खेड्यांतील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते शेखर पगार आणि शिक्षक नेते आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या हंडा मोर्चात सामील होणार आहेत.
हेही वाचा… नाशिक: दुचाकी दुभाजकावर धडकल्याने दोन युवकांचा मृत्यू
२६ गाव पाणी पुरवठा योजनेतील सर्व गावांना आठवडयातून किमान दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात यावा, जोपर्यंत योजनेत ठरलेल्या उद्दिष्टांप्रमाणे दिवसाआड पाणी येत नाही, तोपर्यंत पाणीपट्टी आकारणी करु नये, झोडगे, गुगुळवाड, भिलकोट, पळासदरे आणि पाडळदे या पाच गावांसाठी संजिवनी ठरणाऱ्या मेळवण धरणाचे काम सुरु करण्यात यावे, मालेगांव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढावा, मनमान- इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवावा, आदी मागण्याही मांडण्यात आल्या आहेत.
५५ वर्षापूर्वीपासून सुरु असलेली माळमाथा पाणी पुरवठा योजना आजही २५ ते ३० खेड्यांना पाणी पुरविते. परंतु, सुमारे १२ वर्षांपूर्वी सुरू झालेली गिरणा धरण योजना एवढ्या लवकर कालबाह्य कशी काय झाली ? माळमाथ्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहील. हंडा मोर्चानंतर आमरण उपोषणाची देखील ग्रामस्थांची तयारी आहे. वेळ आल्यास मालेगावहून पायी दिंडी मुंबई येथे घेऊन जाऊ पण पिण्याचे पाणी मिळवूच हा निर्धार आहे. – आर. डी. निकम (शिक्षक नेते, मालेगांव)