आता कुपोषित आणि शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण
विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (रासेयो) माध्यमातून विद्यापीठ स्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्हास्तरावर अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात आले आहेत. विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एक कोटीहून अधिक रकमेची विकासकामे झाली आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात रासयोने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सध्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य व शिक्षण या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून कुपोषित बालके व शाळाबाह्य़ बालकांचा शोध घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयातील एक हजार ७५० आणि वरिष्ठ महाविद्यालयातील १३,५०० विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. रासेयोच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर तालुक्यांची निवड करत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासोबत बैठका घेऊन शिबिरांची आखणी केली. त्यात गावातील भौगोलिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन गाव विकासासाठी आवश्यक सुविधांचा विचार करण्यात आला. या दृष्टीने ग्रामस्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छता अभियानासह शौचालयांसाठी शौचखड्डे, सांडपाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हावा यासाठी व्यवस्था करण्यात आली. तसेच दुष्काळसदृश स्थितीचा विचार करता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर सलग समतल चरही खोदण्यात आले. गावातील महिलांची आरोग्य तपासणी करत त्यांचे हिमोग्लोबिन, रक्तक्षय आदी आजार आहेत का, याची पाहणी करण्यात आली. विविध शासकीय योजनांची माहिती दिली गेली. गावपातळीवर शिबिराच्या माध्यमातून झालेली ही कामे कोटीच्या घरात पोहोचली आहेत. विद्यापीठ स्तरावर त्याचे मूल्यांकन सुरू असल्याची माहिती विभागीय समन्वयक प्रा. अशोक सोनवणे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या सिंहस्थ पर्वात या विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करीत रस्त्याच्या कडेवर जागोजागी उभे राहत भाविकांना नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करण्यास प्रवृत्त केले. याची दखल प्रशासनासह सर्वोच्च न्यायालयाने घेतली असल्याकडे प्रा. सोनवणे यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, शिबिराची औपचारिकता आटोपल्यानंतर शिक्षण विभागाच्या सहकार्याने रासेयो आरोग्य व शिक्षण या विषयावर काम करणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दुर्गम भाग, आदिवासी पाडे यांसह ठिकठिकाणी ०-६ वयोगटातील कुपोषित बालकांची माहिती तसेच परिसरातील स्थलांतरित कामगारांची मुले, बालभिकारी, बालमजूर यासह शाळाबाह्य़ मुलांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्यात येणार आहे. या संदर्भातील बैठक नुकतीच संपन्न झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक प्रा. विवेक काकुळते यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा