जळगाव : जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथे एका तरुणाने चारित्र्याच्या संशयावरून आधी पत्नीवर, नंतर दोघा लहान मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात दोघा मुलांचा मृत्यू झाला असून, महिला गंभीर जखमी आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर जळगाव जिल्ह्यात गौऱ्यापाडा गाव आहे.
हेही वाचा >>> नाशिक-पुणे मार्गावरील गुरेवाडी चौफुली खड्ड्यांमुळे अपघातप्रवण; अपघात वाढत असताना टोल कंपनीची डोळेझाक
या गावात संजय पावरा (२३) हा पत्नी भारती (१९), पाच वर्षांचा मुलगा डेव्हिड आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल यांच्यासह राहत होता. संजय हा कायम पत्नीशी चारित्र्याच्या संशयावरून वाद घालत असे. १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्यात या विषयावरुन जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे त्याची पत्नी दोन्ही मुलांसह मध्य प्रदेशच्या सीमेवरील तिच्या आत्याच्या गावी रांजणगाव येथे निघून गेली होती.
हेही वाचा >>> मुख्यमंत्रीपदाचा पेच असताना एकनाथ शिंदे यांच्या पत्नीची त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा
संजयच्या आई-वडिलांनी रांजणगावला जाऊन सुनेशी वाद घातल्यानंतर नातेवाईकांनी तिला माहेरी मध्य प्रदेशातील देवली येथे घेऊन गेले. त्यानंतर संजय पावरा हा देवलीत गेला. यावेळी पत्नीशी झालेल्या भांडणात त्याने कुऱ्हाडीचे वार करून दोन्ही मुलांची हत्या केली. पत्नीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने पाच ते सहा वार केले. आजूबाजूच्या लोकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी संजय पावरा याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.