घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘मास्क’चा वापर अनिवार्य असतांना आजही नागरीक अनावधानाने मास्क न लावता घराबाहेर पडत आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. घोटी येथे वाहनचालकास मास्क का लावला नाही, असा जाब विचारला असता संशयिताने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. घोटी पोलीस ठाण्यात संशयिता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटी परिसरात पोलीस शिपाई रामकृष्ण लहामटे (३५) हे मंगळवारी नियमित कामावर होते. त्यावेळी घोटी शिवारातील रेल्वे फाटकानजीक संशयित बंडु शिंदे (२९) हा आपल्या दुचाकीवर काही कामानिमित्त तोंडाला मास्क न लावता बाहेर पडला. लहामटे यांनी याबाबत त्याला हटकले.
मास्क न वापरल्याने तुला किंवा तुझ्यामुळे कोणालाही करोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे सांगताच संशयित बंडुने लहामटे यांच्या गणवेशाची कॉलर धरत त्यांना शिवीगाळ केली. आपणास करोनाची भीती वाटत नाही. तुम्ही कोण आम्हांला विचारणारे, अशी धमकी दिली. याविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.