स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारताला राष्ट्रभक्ती व देशप्रेमाचा वारसा दिला आहे. या देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु, देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. देश तोडण्याची भाषा कोणी केल्यास त्याला देशद्रोहीच ठरवले पाहिजे, असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व्यक्त केले. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पर्रिकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
देशावरील प्रेम आणि अभिमानाची भावना बाळगूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगणे योग्य ठरते. सावरकरांच्या विचारांची हीच शिकवण आहे. त्यांनी शास्त्रीय कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासून नंतर तिचा स्वीकार केला. त्यामुळे सावरकर यांची प्रखर देशभक्ती, विज्ञाननिष्ठा आणि जिद्द हे आदर्श विचार आचरणात आणणे ही खरी देशसेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्यासारख्या महापुरूषांचे जीवन व कार्य प्रत्येकात जन्मजात असलेल्या देशभक्तीच्या भावनेला ऊर्जा देण्याचे काम करते. अशा महापुरूषांचे विचार लक्षात ठेवण्याची गरज आहे. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या गीताने बालपणीच आपणास देशभक्तीची प्रेरणा दिली, असे पर्रिकर यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी, सावरकरांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशभक्तीचा लढा पेटवला आणि गुलामगिरीविरुध्द लढण्याचा मंत्र दिल्याचे सांगितले. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना एक दिवस अंदमान तुरुंगात टाकावे म्हणजे त्यांना देशभक्ती कळेल, असा टोला त्यांनी लगावला. प्रास्ताविकात खा. हेमंत गोडसे यांनी भगूरपुत्र वीर सावकरांना भारतरत्न देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी केली.
पर्रिकर यांच्या हस्ते देवळाली छावणी मंडळातील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी भोसला सैनिकी महाविद्यालयास भेट दिली. देवळालीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत येणाऱ्या भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्याचे काम एक ते दीड वर्षांत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. या परिसरातील भ्रमणध्वनीच्या ‘कनेक्टिव्हीटी’ची समस्या सोडवण्यासाठी ‘टॉवर ऑन व्हिल्स’ला मान्यता देण्यात आली आहे. छावणी मंडळातील इमारतींची उभारणी जुन्या चटईक्षेत्र कायद्यानुसार असेल तर तेच चटईक्षेत्र देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निर्धारित करण्यात आली आहेत. त्यामुळे जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचे पर्रिकर यांनी सूचित केले.