लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी येथील मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या ‘मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल’तर्फे परदेशात स्थायिक भारतीयांना मराठी भाषेचे धडे देण्यात येत आहेत.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल’ सुरू करण्यात आले आहे.  जे भारतीय परदेशात स्थायिक झाले आहेत, त्यांना मराठी भाषा शिकविली जाणार आहे. मराठी भाषेला संस्कृती आणि परंपरेचा अभिजात वारसा लाभला आहे. मराठी साहित्य आणि कला यांचा दर्जात्मक ठसा अवघ्या साहित्य विश्वात उमटला आहे. राजभाषेचा दर्जा लाभलेल्या मराठीचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा, या व्यापक दृष्टिकोनातून एक सक्षम पाऊल उचलत कोल्हे यांनी ‘मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल’ची निर्मिती केली आहे. विशेष बाब म्हणजे शाळा सुरू होताच नेदरलँड आणि अमेरिका येथून प्रवेशदेखील झाले आहेत.  नोकरी-व्यवसायानिमित्त लाखो मराठी भाषिक वेगवेगळ्या देशांत स्थायिक झाले आहेत. तसेच विदेशी भाषा म्हणून मराठी भाषा शिकणे हाही पर्याय अनेकांना निवडावासा वाटतो. जे लोक परदेशात स्थायिक आहेत; परंतु पुन्हा मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, इथल्या भाषेशी त्यांना सहज समरूप होता यावे. तसेच नात्यांमध्ये भाषेचा अडसर येऊन विकल्प येऊ नये, या उद्देशाने या शाळेची निर्मिती करण्यात आलेली आहे. केवळ परदेशात स्थायिक मराठी लोकांनाच नव्हे , तर जगातील कोणत्याही देशातील आणि कोणत्याही भाषिक लोकांना या शाळेच्या माध्यमातून मराठी शिकता येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषा लोप पावत चालली असल्याची ओरड होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा गोडवा अनुभवता यावा, मराठी भाषा आत्मसात करता यावी, या उद्देशाने मानवधन संस्थेतर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थेतर्फे ऑनलाइन स्वरूपात मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत.

Story img Loader