अनुकूल निकाल देण्यासाठी पाथर्डीचे मंडळ अधिकारी व एका महिलेला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पुरूषोत्तम पराडकर असे त्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून केतकी चाटोरकर असे त्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा- उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे मतदार नोंदणी संथ; नाशिक पदवीधर मतदारसंघात केवळ ४० हजार अर्ज
तक्रारदाराने पाथर्डीच्या मंडळ कार्यालयात अर्ज सादर केला होता. या अर्जानुसार त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी संशयित मंडळ अधिकारी पुरूषोत्तम पराडकर व खासगी महिला केतकी चाटोरकर यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५० हजार रुपये ठरले. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. या तक्रारीच्या आधारे विभागाने सापळा रचला. पराडकरने लाचेची रक्कम चाटोरकरला स्विकारायला सांगितली. ही रक्कम घेत असताना संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. संशयित मंडळ अधिकारी पराडकर व खासगी महिला चाटोरकर यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.