नाशिक – आजवर राष्ट्रवादीने (अजित पवार) छगन भुजबळ यांना जितका न्याय दिला, तितका कोणीही दिलेला नाही. भुजबळांबाबत पक्षाची कुठलीही चूक झालेली नाही. त्यामुळे त्यांची समजूत काढली जाणार नाही, असे राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी स्पष्ट केले.
माजीमंत्री भुजबळ यांनी सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. यावर कोकाटेंनी भुजबळांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भुजबळांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवले असेल. मुख्यमंत्रीही त्यावर तोडगा काढण्याचा विचार करतील. भुजबळ हवा तो निर्णय घेऊ शकतात, असे कोकाटे यांनी नमूद केले.
हेही वाचा – परभणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, अमित शहा यांच्याविरुद्धही घोषणा
भुजबळ यांना ओबीसी म्हणून केवळ ते स्वत:, मुलगा आणि पुतण्या दिसतो. बाकी कोणी दिसत नाही. आपल्यासह सर्व ओबीसी आहेत. आपल्या मतदारसंघात मराठा-ओबीसी समाजबांधव एकत्रितपणे काम करतात. त्यांचा परस्परांवर विश्वास आहे. समाजात तेढ निर्माण करणे, जातीवादाचे ढोंग आपणास मान्य नाही, असे नमूद करत कोकाटे यांनी भुजबळांना फटकारले. मंत्रिमंडळात ४२ पैकी १७ मंत्री ओबीसी तर, १६ मंत्री मराठा आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतल्याचे कोकाटे यांनी नमूद केले. भुजबळांना मंत्रिपद मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मध्यस्थी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – मालेगावात शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थी अन् शिक्षकांची ‘शाळा’
कांदाप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा करणार
सध्या कांद्याचे भाव कमी झाले आहेत. विधानसभेत निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली. हे शुल्क कमी होऊन भाव वाढतीलही. पण तो तात्पुरता उपाय ठरेल. कांदा, द्राक्ष, कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, असे कोकाटे यांनी नमूद केले. कृषी विभाग हे आव्हानात्मक खाते आहे. सात दिवस आणि २४ तास सेवेत राहावे लागते. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन पातळीवर जे काही करता येईल ते केले जाईल, असे त्यांनी सांगितले.