धुळे – सध्या सुरु असलेली मनमाड-दादर अमृतसर एक्सप्रेस लवकरच धुळे रेल्वे स्थानकातून सुटणार असून मनमाडमार्गे दादर असा तिचा प्रवास असणार आहे. आठवड्यातून तीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतल्यानंतर ही रेल्वे रोज धुळेकरांच्या सेवेत राहील, अशी माहिती खा. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
हेही वाचा >>> सप्तश्रृंग गड शिखरावर कीर्तिध्वज फडकला; भाविक परतण्यास सुरुवात
करोना टाळेबंदीत बंद झालेली मुंबई बोगी आणि त्याचवेळी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससेवेचे वाढलेले प्रवासी भाडे यामुळे मुंबईला जा-ये करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. यामुळे प्रवाशांनी धुळे-मुंबई बोगीसाठी खासदार भामरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. केवळ एक बोगी मिळविण्यापेक्षा भामरे यांनी स्वतंत्र रेल्वेचीच मागणी लावून धरली. धुळे-मनमाड-दादर अशी रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंडळाचा हिरवा कंदील मिळाला आहे. ही रेल्वे प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस आणि प्रतिसाद मिळू लागताच दररोज धावणार आहे. सकाळी साडेसहा वाजता धुळे स्थानकातून निघणारी ही गाडी दुपारी दीड वाजता मुंबईला पोहोचेल. मुंबईहून दुपारी साडेचार वाजता निघून रात्री ११ वाजता धुळ्याला पोहचेल. लवकरच ही रेल्वे सुरू होईल, असे खासदार भामरे यांनी म्हटले आहे. धुळे ते मनमाड या लोहमार्गावर अनेक तांत्रिक अडचणी असल्याने हा प्रश्न खिततपत पडला होता. मुंबईला जाण्यासाठी असलेली धुळेकरांसाठीची एक बोगीही बंद झाली होती. एका बोगीतून अधिकाधिक प्रवाशांना प्रवास शक्य नसल्याने अनेक डबे असलेल्या गाडीचा विचार पुढे आल्याचे खासदार भामरे यांनी नमूद केले.