मनमाड – उत्तर आणि दक्षिण भारत या दोन प्रदेशांना जोडणाऱ्या आणि विकासाचा मार्ग ठरणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. निम्म्याहून अधिक मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे.

दौंड-मनमाड रेल्वे मार्ग दुहेरीकरण २३६ किलोमीटरचा असून या कामासाठी २०८१ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत आतापर्यंत काष्टी ते बेलवंडी- बेलापूर ते पुणतांबा आणि कान्हेगाव ते मनमाड असे १०२ किलोमीटर लोहमार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या दौंड ते काष्टी, बेलवंडी ते बेलापूर आणि पुणतांबा ते कान्हेगाव अशा १३४ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आणि दुहेरी मार्ग अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. एकूण २३६ किलोमीटरपैकी १०२ किलोमीटरचे रेल्वे मार्ग दुहेरी करण्याचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित १३४ किलोमीटर ट्रॅक दुहेरीकरणाचे काम जोरात सुरू आहे.

हेही वाचा – नाशिक : पावसाच्या विश्रांतीने शेतकरी चिंतेत, पेरण्या आणखी लांबणार

दौंड-मनमाड विभागाच्या लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वेचा वेग वाढण्यास मदत होईल आणि रेल्वे ओलांडण्यासाठी थांबण्याची वेळ यापुढे येणार नाही. सध्या मनमाड ते दौंड हा एकेरी लोहमार्ग आहे. याच मार्गावरून अहोरात्र मेमो शटल मेल, एक्सप्रेसशिवाय मालगाड्या सातत्याने धावत असतात. एकेरी मार्गामुळे अनेक वेळेला क्रॉसिंगसाठी गाडीला कुठे ना कुठे थांबा घ्यावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रवासाला विलंब होतो. रेल्वे गाड्यादेखील विलंबाने धावतात. अपघातासारखी एखादी घटना घडली तर पूर्ण मार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प होते. पण रेल्वेने दौंड-मनमाड रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दीड वर्षापासून या कामाला कमालीचा वेग आला आहे. टप्प्याटप्प्याने लोहमार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व रेल्वे गाड्या दुहेरी मार्गावरून धावतील. त्यामुळे क्रॉसिंगसाठी थांबण्याची वेळ येणार नाही. शिवाय रेल्वेची मालवाहतूक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाढेल, त्यामुळे रेल्वेला मोठा महसूलदेखील प्राप्त होऊ शकतो. या शिवाय दक्षिण भारतातून मनमाडमार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्यादेखील वाढणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत दौंड मनमाड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मनमाड रेल्वे स्थानकाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

Story img Loader