मनमाडसह येवला शहरातील नागरीक पंधरा दिवसांपासून प्रतिक्षा करीत असलेल्या पालखेड धरणातून पुढील दोन दिवसात पाणी सोडले जाणार आहे. नाशिक येथे कुंभमेळा बंदोबस्तात अडकलेले पोलीस एक-दोन दिवसात येथे रुजू होतील. पालखेड कालव्याच्या परिसरात त्यांचा बंदोबस्त सुरू झाल्यावर गुरूवारी किंवा शुक्रवारी पाणी सोडले जाणार आहे.
पालखेड धरण समूहाचे कार्यकारी अभियंता पी. के. शिंपी यांनी पालखेडचे पाणी सोडण्याबाबतची तयारी, शिल्लक जलसाठा, लागणारा बंदोबस्त, वीज पुरवठय़ाची स्थिती, संभाव्य पाणी चोरीची शक्यता, पाटोदा साठवणूक तलावापर्यंत पाणी पोहोचण्यास लागणारा वेळ आदींबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या धरण समूहात सध्या १८०० दशलक्ष घनफूट साठा आहे. हे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. पालखेडच्या आवर्तनासाठी ९०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. ही स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. सध्या मनमाडचे वाघदर्डी धरण तसेच पाटोदा साठवणूक तलाव येथील जलसाठा संपल्याने शहराला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. येवल्यातही पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असून मनमाड रेल्वे परिसरास जिथून पाणी पुरवठा होतो, तो पाटोद्याजवळचा रेल्वे बंधाराही कोरडा पडला आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर ऐन पर्वणीत तीव्र टंचाई जाणवत आहे. या स्थितीचा विचार पालखेडचे पाणी सोडणे हा एकमेव पर्याय असल्याने एक-दोन दिवसात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पालखेड धरणातून त्वरीत पाणी सोडण्याची मागणी आ. छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्याकडे याआधीच केली आहे. मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटोदा आणि वाघदर्डी या जलाशयातील पाण्याचा साठा संपल्याने मनमाड शहरामध्ये भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे २५ दिवसांपासून शहराला पाणी नाही. सद्यस्थितीत टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकरची संख्या अल्प असल्यामुळे मनमाडकरांचे पिण्याचा पाण्यावाचून हाल होत आहेत. शहर आणि परिसरात असलेल्या विहिरी व कूपनलिका बंद पडल्या असून पाण्याचे सर्व स्त्रोत कोरडे झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी मनमाडकरांवर स्थलांतराची वेळ आली आहे. मनमाडकरांसाठी पालखेड धरणातील पाणी न सोडल्यास हा मनमाडकरांवर अन्याय होईल. पाणी सोडण्यात येत नसल्याने मनमाडकरांमध्ये तीव्र संताप आणि असंतोष असून त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.
..अखेर मनमाडसाठी पालखेडचे पाणी सोडणार
मनमाडसह येवला शहरातील नागरीक पंधरा दिवसांपासून प्रतिक्षा करीत असलेल्या पालखेड धरणातून पुढील दोन दिवसात पाणी सोडले जाणार आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 03-09-2015 at 02:38 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad gets water from palkhed dam