मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जानेवारीत होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना पुरस्कृत स्वतंत्र पॅनल सोसायटी व ग्रामपंचायत गटासाठी उभे करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बाजार समितीच्या सोसायटी गटातील ११ जागांसाठी २९६ मतदारांनी यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी २०१ मतदारांची यादी जाहीर करण्यात आली. व्यापारी गटातील २ जागांसाठी २२३ मतदार आहेत, तर हमाल-मापारी गटातील एका जागेसाठी १३६ मतदार आहेत.
मनमाड बाजार समिती काही वर्षांपासून गैरव्यवहार व भ्रष्टाचारी कारभाराबाबत गाजत असतानाच आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर निवडणूक आता जानेवारीच्या अखेरीस होईल, हे निश्चित झाले आहे. येत्या तीन-चार दिवसांत अधिकृत तारीख जाहीर होईल. त्यानुसार इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, अनिल आहेर, जगन्नाथ धात्रक, राजाभाऊ यांच्या बरोबर जिल्हा बँक उपाध्यक्ष सुहास कांदे, माजी सभापती प्रकाश घुगे, व्यंकट आहेर, राजेंद्र पवार, जिल्हा बँक माजी संचालक चंद्रकांत गोगड व व्यापारी गटातून ललवाणी, सुराणा, राका, दादा बंब आदींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नव्या स्थित्यंतरानुसार व बदलत्या समीकरणानुसार जिल्हा बँक उपाध्यक्ष सुहास कांदे व माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप यांच्या आघाडीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी तसेच उभय गटांतील नाराजांचा तिसरा गट अशी चुरस या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांनी मेळावा घेऊन नव्याने हालचाली सुरू केल्या आहेत. जुने-नवे संचालक तसेच माजी आमदार अनिल आहेर यांचा गट काय भूमिका घेतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे. प्रगती बँक निवडणुकीनंतर व्यापारी गटातून मोठय़ा प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे. व्यापारी, सोसायटी व ग्रामपंचायत गटातही मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Story img Loader