लोकसत्ता वार्ताहर
मनमाड: शहरातील पांझण नदीपात्रालगत कत्तलीच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या पाच गाई, ३४ बैल अशी ३९ जनावरे तसेच मनमाड-मालेगाव राज्यमार्गावर वाहनातून सहा जनावरे अशी एकूण ४५ जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस शिपाई समाधान देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पांझण नदीलगत एफसीआय खाणीशेजारी पाच गाई आणि ३४ गोऱ्हे अशी एकूण ३९ गोवंश जनावरे कुणीतरी कत्तलीच्या इराद्याने आणून त्यांना त्रास होईल, अशा प्रकारे दोरखंडानी निर्दयतेने बांधून ठेवली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा… धुळे RTO कार्यालयासाठी आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण; मोर्चाव्दारे निषेध
दुसऱ्या घटनेत मनमाड पोलीस पथकाने मालेगाव नाका येथे केलेल्या नाकाबंदीवेळी येवल्याकडून मालेगावकडे जात असलेले वाहन थांबविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता सहा बैल दोराच्या सहाय्याने जखडलेल्या अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी या जनावरांना सुरक्षित बाहेर काढले. चालक मतीन मेहमुद मुलतानी (निहार खेडा) आणि त्याच्या सोबत असलेल्या भिमराज जठार (येवला) दोघांची विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पाच लाख ९० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.