टंचाईमुळे अस्वस्थ ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
मनमाड : शहरात नगरपालिका क्षेत्रात महिन्यातून दोनदा म्हणजेच पंधरा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत असल्याने आधीच मनमाडकर वैतागलेले असताना दुसरीकडे मात्र धरणातील मुख्य जलवाहिनीला तब्बल ११ ठिकाणी असलेल्या गळतीकडे दोन वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या असंतोषात भर पडली आहे. याप्रश्नी आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात मनमाडची पाणी टंचाई सर्वानाच माहीत आहे. अनेक वर्षांपासून मनमाडकरांना कायम टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने पाण्याच्या एकेका थेंबाचे महत्व मनमाडकरांना सर्वाधिक माहीत आहे. याआधी एक, दोन वर्षांपूर्वी तर मनमाडला महिन्यातून एकदा नळाव्दारे पाणी पुरवठा होत असे. ते प्रमाण मागील काही दिवसात कमी झाले असले तरी टंचाई कायम आहे. सध्या नगरपालिका क्षेत्रात महिन्यातून दोन वेळा म्हणजे पंधरा दिवसातून एक वेळा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. धरणातील मुख्य जलवाहिनीला १० पेक्षा अधिक ठिकाणी गळती होत असून दोन वर्षांपासून या गळतीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीने केला आहे. धरणात असलेले पाणी या गळतीद्वारे वाया जाऊन धरणाजवळच्या सानप वस्तीजवळ असलेला बंधारा ऐन उन्हाळय़ात भरण्याची किमया साधली गेली आहे. मात्र धरणात पाणी असूनही केवळ निष्काळजीपणामुळे मनमाडकरांना १५ दिवसातून एकदाच पाणी मिळत असल्याकेड समितीने लक्ष वेधले आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी १५ दिवस पुरविणे अतिशय कठीण होत असल्याचे समितीच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधान एकिकडे पाण्याचा एकेक थेंब वाचविण्यासाठी आवाहन करत असताना पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मनमाडमधील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे समितीने म्हटले आहे. मनमाडकरांना भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येविषयी पुढील आठ दिवसात काही सकारात्मक कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीने निवेदनाव्दारे दिला आहे. यासंदर्भातील निवेदन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पारीक, सचिव एस. एम. भाले, कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, मनमाडकरांना टंचाईपासून सुटकेसाठी मागील वर्षांप्रमाणेच यंदाही चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.