लोकसत्ता वार्ताहर
मनमाड: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मे महिन्यांत शहराला होणारा पाणीपुरवठा १९ ते २१ दिवसांआड करण्याचे नियोजन मनमाड पालिकेने केले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत मनमाड नगरपालिकेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात सद्यस्थितीत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून वागदर्डी जलशुध्दीकरण केंद्रास गुरुत्वाकर्षण बलाने (ग्रॅव्हीटी) १०० टक्के पाणी पुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात सध्या १५ ते १७ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पालखेड धरणांतून आरक्षित बिगर सिंचनाचे पाणी मेमध्ये मिळणे अपेक्षित आहे. परंतु, अल-निनोच्या प्रभावाने यंदा पावसाळा उशिरा आणि कमी दिवसांचा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे बिगर सिंचन आवर्तनाचे पाणी उशीरा उपलब्ध होणार आहे.
आणखी वाचा- मालेगावजवळ बस उलटून चार जण जखमी
सद्यस्थितीत वागदर्डी धरणांतील उपलब्ध पाणी ऑगस्ट २०२३ अखेरपर्यंत पुरविण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाईची स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहराला नगरपालिकेमार्फत १५ ते १७ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यात आणखी चार ते पाच दिवसांची वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यांत मनमाड नगरपालिकेमार्फत शहराला १९ ते २१ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पालखेड धरणांतून आवर्तनाचे पाणी उपलब्ध होताच शहराचा पाणी पुरवठा सध्या होतो, तसा पूर्ववत केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
नागरीकांच्या होणार्या गैरसोयीबद्दल मनमाड पालिका दिलगिरी व्यक्त करीत असून भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाय योजनांना सर्वांनी सहकार्य करावे. पाण्याचा अपव्यय करू नये, गळती थांबवावी, पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल आणि पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता अमृत काजवे यांनी केले आहे.