नाशिक – मराठा नेते मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीच्या समारोपानिमित्त नाशिक येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेरी शांततेत पार पडली. समारोपानिमित्त आयोजित सभा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी सभास्थळी गोंधळाचे वातावरण होते.
तपोवन परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगवा ध्वज, भगवी टोपी, काही भगवे वस्त्रधारी यामुळे परिसर भगवामय झाला होता. फेरी सुरू असताना जरांगे यांच्या वाहनापुढे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा होता. पंचवटी कारंजासह अन्य ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. आडगाव नाका परिसरात त्यांचे वाहन येताच जरांगे यांची तब्येत काहीशी बिघडली. थोडावेळ रुग्णवाहिकेत आराम करत त्यांनी पुढे फेरीत सहभाग घेतला. यामुळे आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. ही फेरी तपोवन-आडगाव नाका-पंचवटी कारंजा-रविवार कारंजा-रेडक्रॉस सिग्नलमार्गे सीबीएस येथे आली. फेरीतील लोकांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. फेरी येण्याआधी सभास्थळावर शिवरायांच्या पोवाड्यांनी वातावरण निर्मिती करण्यात आली.
हेही वाचा >>> फडणवीस-भुजबळ यांचा दंगली घडविण्याचा डाव – मनोज जरांगे यांचा आरोप
फेरी सभा स्थळी आल्यावर काही वेळ गोंधळ उडाला. जरांगे यांचे वाहन शासकीय कन्या विद्यालयाकडून सभास्थळी येत असतांना उपस्थितांनी त्याच रस्त्यावर ठाण मांडले होते. उत्साही कार्यकर्ते सभास्थळी असलेल्या दुभाजकांमधून व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न करत होते. व्यासपीठावर कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोठी गर्दी होती. या सर्व वातावरणात तसेच प्रकृती बरी नसल्याने जरांगे यांना व्यासपीठावर येण्यास विलंब झाला. ते व्यासपीठावर येताच फटाक्यांची आतषबाजी झाली. परिसरातील इमारतींच्या छतावर, मिळेल त्या ठिकाणी उभे राहत लोकांनी त्यांचे स्वागत केले. पोलिसांनी खबरदारीसाठी दीड हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी तैनात केले असले तरी चोरीचे काही प्रकार घडले.
लक्षवेधक घोषणा
तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ- जय शिवराय…एक मराठा- लाख मराठा…मी कुणबी मी मराठा…मनोज जरांगेचा बालेकिल्ला नाशिक नाशिक…जय शिवराय, यांसह वेगवेगळया घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फेरीत सहभागी झालेल्यांनी हळदीचे मळवट भरत त्यावर कुंकवाने मराठा हे अक्षर लिहिले होते.
हेही वाचा >>> मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीत छगन भुजबळ लक्ष्य; नाशिकमध्ये फेरीच्या प्रारंभापासून भुजबळांविरोधात घोषणाबाजी
भुजबळ फार्मभोवती बंदोबस्त
मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. या पार्श्वभूमीवर, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी भुजबळ फार्म येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तामुळे फार्म हाऊसला छावणीचे स्वरूप आले. भुजबळ समर्थक गजु घोडके हे जरांगे यांना संविधानाची प्रत देणार होते. मात्र पोलिसांनी घोडके यांना त्यांच्या निवासस्थानातूनच ताब्यात घेतले. सायंकाळी उशीरापर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात होते.
लोकांची पायपीट
मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नियोजित वेळ ११ वाजेची होती. तीन तास उशीराने त्यांच्या शांतता फेरीला सुरूवात झाली. या फेरीच्या समारोपासाठी नाशिक जिल्हाच्या विविध भागासह संभाजीनगर, बीड या ठिकाणाहूनही लोक फेरीत सहभागी झाले. बाहेरगावहून आलेल्या लोकांची वाहने शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहनतळावर लावण्यात आली. तर काहींनी तपोवन येथेच वाहने लावली. तेथुन सीबीएस पर्यंत सहा किलोमीटरची पायपीट फेरीत सहभागी लोकांना करावी लागली. या फेरीची पुर्वकल्पना काहींना नसल्याने त्यांना नियोजित ठिकाण गाठण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागला.
फेरीमुळे वाहतुकीवर परिणाम
मनोज जरांगे पाटील यांची शांतता फेरी शहर परिसरातील विविध मार्गावरून मार्गस्थ होणार असल्याने वाहतुक विभागाच्या वतीने वाहतुक मार्गात बदल करण्यात आला होता. तर काही ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. याचा परिणाम वाहतुकीची वर्दळ कमी होती. मात्र सभा सुरू असतांना पर्यायी मार्गावर मात्र वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला.