मानसिक आरोग्य या विषयावरील तीन नाटकांच्या मानसरंग या अभिनव नाट्य महोत्सवाचे ज्येष्ठ दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये २९ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. मानसिक आरोग्य किंवा मनाचे आजार याविषयी सामाजिक सजगता निर्माण करण्यासाठी साताऱ्यातील परिवर्तन या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून हा नाट्य महोत्सव होणार आहे.
रविवारी दुपारी दीड वाजता परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात मानसिक आरोग्य आणि सजगता यावर होणाऱ्या चर्चेसाठी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ अभिनेते तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ नाटककार तथा अभ्यासक राजीव नाईक, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शिरीष सुळे, डॉ. उमेश नागापूरकर, कुसुमाग्रज स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले आणि ज्येष्ठ रंगकर्मी विवेक गरुड उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक माधव पळशीकर आणि प्रेमनाथ सोनवणे यांनी दिली.
मराठी रंगभूमीला नव्या वळणावर विधायक आशय देणाऱ्या आणि महाराष्ट्रभर गाजत असलेल्या तीन नाटकांमध्ये श्रीपाद देशपांडे लिखित व अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित “रंगीत संगीत गोंधळ”, ओंकार गोखले लिखित व क्षितीज दाते दिग्दर्शित “न केलेल्या नोंदी” आणि दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित नाशिकचे “तो राजहंस एक” यांचा समावेश आहे. नाटकांचा एकत्रित प्रयोग करणे हे फार कठीण असताना नाशिककर रसिकांच्या मागणीतून हे आयोजन जूळवून आणण्यात आले आहे. विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर, प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, विविदा वेलनेस रिट्रीटचे संचालक उमेश भदाणे, लोकेश शेवडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम, संदीप सोनवणे, निवृत्त आयुक्त जीवन सोनवणे, सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड हे आयोजन करीत आहेत. प्रत्येकी सुमारे ७५ मिनिटांच्या तिन्ही नाटकानंतर चर्चासत्र आणि प्रश्नोत्तरे होतील. या महोत्सवाला नाशिककरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संयोजक पळशीकर आणि सोनवणे यांनी केले आहे.
हेही वाचा – नाशिक: सावजाच्या शोधात बिबट्या विhttps://www.loksatta.com/nashik/leopard-in-the-well-in-search-of-salvation-nashik-news-amy-95-3422897/हीरीत
सजगतेसाठी नाटक – डॉ. हमीद दाभोलकर
मानसिक आरोग्य हा सध्याचा अतिशय संवेदनशील विषय आहे. विशेषत: करोना काळानंतर मानसिक आरोग्याची समस्या अधिक बिकट झाल्याचे निदर्शनास येत आहे. आर्थिक तणाव, संसारिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थैर्य, पती-पत्नीतील बेबनावातून वाढत जाणाऱ्या घटस्फोटाच्या घटना यामुळे मानसिक आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. त्यातूनच मानसरंग हा उपक्रम सुरू झाला आहे.
विलक्षण पर्वणी – डॉ. मोहन आगाशे
मानसिक आरोग्याचे महत्व कोणताही प्रचार न करता अतीशय संवेदनशील कथानकांतून हाताळणारी ही तीन नाटके पहाणे एक विलक्षण पर्वणी आहे. नाशिककरांनी आवर्जून बघावीत. मानसिक आरोग्याचे महत्व इतक्या हळुवारपणे, संवेदनशीलपणे मांडणारी अशी नाटके मराठी रंगभूमीवर येणे ही महत्वाची बाब आहे.