नाशिक : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने ६२ कोटींचा निधी मंजूर केला असला तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास केवायसीमुळे विलंब होत आहे. जिल्ह्यातील १३१६ गावांमधील ४९ हजार २५८ शेतकऱ्यांना ही मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे केवायसी झाल्याशिवाय ती रक्कम वर्ग होत नाही. यामुळे मदत वाटपाची प्रक्रिया संथपणे पुढे जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवकाळी पावसाने जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात अतिवृष्टीमुळे एकूण ४४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने ६२ कोटींची मदत मंजूर केली आहे. तथापि, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यात केवायसीचा अडथळा आला आहे. ज्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली, त्यांची नावे यादीत आहेत.

हेही वाचा…सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये उपोषण

संबंधितांच्या बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पार पाडल्याची खात्री करून ही मदत वर्ग केली जाते. अनेकांची केवायसी झालेली नसल्याने मदत वाटपाची प्रक्रियाही रेंगाळली आहे. शासकीय यंत्रणेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वेळी केवायसी करणे बंधनकारक आहे. केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची यादी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अपलोड केली जाते. त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाते.

तलाठी, कृषी अधिकाऱ्यांना सूचना

जिल्ह्यात जवळपास ५० हजार शेतकऱ्यांना मदत वाटपाचे काम सुरू आहे. स्थानिक यंत्रणेला केवळ निधी मंजुरीचे पत्र व शेतकऱ्यांचे तपशील मिळतात. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना पडताळणी करावी लागते. तसेच इ केवायसी पूर्ण करावी लागते. या प्रक्रियेसाठी शेतकर्यांना तलाठी कार्यालय आणि नंतर तहसीलदार कार्यालयाला भेट द्यावी लागेल. जेणेकरून सरकारी मदत देण्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेता येईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकत्रित आणून ही प्रक्रिया करण्यासाठी गावातील तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांना पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many eligible farmers yet to complete kyc delay in getting government aid at nashik psg