लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : व्यवसायात पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून अनेकांची सुमारे दोन कोटी ३१ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान हिरे (रा. अश्विनी सोसायटी, नाशिक) हे व्यापारी असून, त्यांची कोल्हापूर येथील नितेशकुमार बलदवा यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. बलदवा यांनी हिरे यांना, व्यवसायात पैसे गुंतविण्याचे आमिष दाखविले. बलदवा यांच्यावर विश्वास असल्याने हिरे यांनी आपल्या मित्रांना याबाबत सांगितले. नितेशकुमार बलदवा, दुर्गा बलदवा (दोघेही रा. आझादरोड, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) आणि त्यांचा साथीदार नजिम मोमीन (रा. बागल चौक, कोल्हापूर) या तिघांनी मिळून हिरे यांच्यासह त्यांच्या मित्रांची नाशिकरोड येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांना व्यापाराविषयी माहिती दिली. बलदवा यांच्यावर विश्वास ठेवून हिरे यांच्या मित्रांनी त्यांच्या विविध बँक खात्यावर एक कोटी ९० लाख रुपये टाकले. आणि ४१ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत घडला.

दरम्यान, संशयितांनी हिरे यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी दोन कोटी ३१ लाख रुपये घेतले. त्यानंतर हिरे यांच्या मित्रांनी पैशांची मागणी केली असता या पैशांच्या मोबदल्यात अवघ्या वर्षभरात दामदुप्पट देतो, असे संशयितांनी सांगितले. आम्ही तिघांनी मिळून अनेकांचा खूप फायदा करुन दिला आहे, तसा तुमचाही करुन देऊ. तुम्हाला देखील १५ टक्के पैशांचा परतावा भेटणार आहे. हे पैसे आम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करुन त्यातून मिळणारा नफा तुमच्या बँक खात्यावर दररोज जमा करू, असे सांगत अधिकाधिक पैशांचा परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरूवातीला काही पैसे तीन महिन्यांमध्ये बलदवा यांनी परत केले. उर्वरित पैशांची मागणी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर भ्रमणध्वनीला प्रतिसाद देणेही बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हिरे आणि त्यांच्या मित्रांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध तक्रार केल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader